महापालिकेला ओझे रंगभवन प्लाझाचे ; कुणी मक्तेदार देता का मक्तेदार ? रंगभवन प्लाझासाठी मक्तेदार मिळेना महापालिकेला ;


आचार्य शांतीसागर स्तंभ समस्याच्या विळख्यात ; जैन समुदायाच्या दुखावल्या जातायत भावना
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १० जुलै – सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत सुशोभित झालेले रंगभवन प्लाझा सध्या दुरावस्थेच्या गर्तेत सापडले आहे. मोठा गाजावाजा करत सुरू केलेला रंग भवन प्लाझा काळोखाच्या छायेत आहे. सदरचा रंगभवन प्लाझा सोलापूरची शान म्हणून ओळखला जायचा परंतु सध्याची अवस्था दयनीय बनली आहे.
सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आणि बोगस असून त्याचा प्रत्यय प्रत्येकवेळी येत आहे. कोटींचा खर्च करून उभारलेला रंगभवन प्लाझा अंधाराच्या काळोखात सापडला आहे. महापालिका प्रशासनाला रंगभवन प्लाझावरील एल. ई. डी स्क्रीन आणि सोलर पॅनल सुरू करण्यासाठी एकही मक्तेदार मिळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संपूर्ण रंगभवन परिसर अंधाराच्या गर्दीत अडकला आहे. याच ठिकाणी जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेले आचार्य शांतीसागर यांचा स्तंभ आहे. परंतु या ठिकाणी विविध समस्या आणि दुरावस्था निर्माण होत असल्याने जैन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्याकडे देखील पालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी दुर्लक्ष करीत आहे. स्मार्ट शहरातील स्मार्ट प्रकल्प अशा पद्धतीने जर बंद पडत असतील तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. अशी प्रतिक्रिया आता सोलापूरकरांमधून उमटत आहे.
रंगभवन चौक येथे पब्लिक प्लाझाची निर्मिती रंगभवन चौक येथे सौरउर्जेवर आधारित एलईडी पॅनलच्या माध्यमातून आकर्षक अशा पब्लिक प्लाझाची निर्मिती करण्यात आलेली होती. रूपांतरित रंगभवन चौक हा सोलापूर शहरातील एक वैशिष्ट्यपूर्ण असा परिसर निर्माण झालेला आहे. मध्यभागी असलेल्या जागेवर अर्ध-छायांकित अर्बन प्लाझा उभारणेत आलेला आहे. ह्यासाठी १०० सोलर पॅनेल्स आणि ३६ एल.ई.डी. व्हिडिओ पॅनेल्सचा वापर केला गेला आहे. ह्यापैकी काही व्हिडिओ पॅनेल्सचा वापर नागरिकांना विविध विषयांवरचीमाहिती देण्यासाठी केला जात आहे. चौकाभोवती योग्य प्रकारचे पार्किंग आणि क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. यावर जाहिरात करुन मनपाचे उत्पन्न वाढविता येवू शकणार आहे. सदर कामाचा मक्ता राजश्री कन्सट्रक्शन, मुंबई यांना देण्यात आला व या कामाकरीता सुमारे ४.३८ कोटी इतका खर्च आलेला आहे. दरम्यान सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत कोरडो रुपयांची कामे झाली. त्यामध्ये सर्वप्रथम रंगभवन चौकातील रंगभवन प्लाझाचे काम करण्यात आले होते. सुरुवातीचे काही दिवस स्मार्ट सिटी कंपनीने त्याचे काम पाहिले. परंतु जेव्हा रंगभवन प्लाझा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला त्यानंतर मात्र त्याला उतरती कळा लागलेली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत ४.३८ कोटी रुपयांची कामे झाली. परंतु त्याची सद्य स्थितीत दयनीय अवस्था आहे. रंगभवन प्लाझा याठिकाणी असलेले आमचे श्रद्धास्थान आचार्य शांतीसागर यांचा स्तंभ विविध समस्येच्या विळख्यात अडकला आहे. पूर्वी त्या ठिकाणी एक वॉचमन ठेवण्यात आला होता परंतु आता सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या जात आहेत याकडे स्मार्ट सिटी आणि महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन एक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी केली आहे.
केतन शहा , सदस्य सोलापूर विकास मंच