महापालिकेने जारी केली सक्तीची नळपट्टी….
अजब महापालिकेचा गजब कारभार ; गेल्या वर्षभरापासून अनेक मिळकतदारांना सोसावी लागतीय सक्तीची नळपट्टी….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २२ जुलै – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गेल्या वर्षभरापासून सक्तीची नळपट्टी वसूल केली जात आहे. महापालिकेमध्ये सदस्यांच्या अनुपस्थितीत महापालिका प्रशासनाने सक्तीचा लगान वसूल केल्याचे या निमित्ताने दिसत आहे. ज्या मिळकतींना नळ नाही अशा मिळकतदारांकडून देखील सक्तीने नळपट्टी वसूल केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान अजब महापालिकेच्या या गजब कारभारामुळे सोलापूरचे नागरिक मात्र पुरते वैतागले आहेत. वर्षातील ३६५ दिवस पाणीपुरवठा न करता संपूर्ण वर्षभराचे शुल्क मिळकतदाराकडून आकारले जाते. वर्षभराचा पाणी पुरवठा न करताच महापालिका प्रशासनाने हा गजब शुल्क आकारला आहे. सध्या शहरातील विविध मिळकतदारांकडे चालू आर्थिक वर्षाचे करपट्टी पाठवली जात त्यामध्ये ज्या मिळकतीला नळ नाही त्या मिळकतीला देखील नळपट्टी लावल्याने नागरिक महापालिकेच्या या नियोजनशून्य कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.
चालू आर्थिक वर्षाचे करपट्टीचे वाटप मिळकतदारांना केले जात आहे. करपट्टी दिल्यानंतर तात्काळ कर भरण्याचा सपाटा देखील संबंधित महापालिकेच्या कर आकारणी आणि संकलन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळकतदारांना केला जात आहे. सदरचा कर भरण्यासाठी मिळकतदारांना अजून कालावधी असताना देखील तात्काळ कर भरण्याची सक्ती केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. महापालिकेच्या कर आकारणी आणि संकलन विभागाचा अजब कारभार मिळकतदरांसाठी डोकेदुखीचा सबब ठरत आहे.
महापालिकेकडून सक्तीने नळपट्टी वसूल
महापालिका प्रशासनाने नळ नसताना देखील नळपट्टी लावून सुमारे वर्षभराचे कर वसूल केले होते. आता सुद्धा हीच परिस्थिती आहे. सध्या मिळकत कराचे बिल वाटप सुरू आहे त्यामध्ये सक्तीने नळ पट्टी लावलेली आहे एक वर्षाचे सुमारे तीन हजार रुपयांचा अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. त्याच पद्धतीने युजर चार्जेस देखील लावण्यात आलेले आहेत. वास्तविक पाहता महापालिका प्रशासन नागरिकांना कोणत्याही प्रकारचे मूलभूत सोई सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत असताना महापालिका प्रशासनाने वाढीव बिले का द्यावे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
– स्थानिक नागरिक
कारखान्याला नळ नसताना लावली पट्टी
आमच्या फॅब्रिकेशनच्या कारखान्याला नळ नसताना देखील त्या ठिकाणी नळपट्टी लावण्यात आली आहे. वर्षभराची सुमारे तीन हजार रुपयांची करपट्टी विनाकारण लावण्यात आली आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता, तो नळपट्टीचा कर तुम्हाला भरावाच लागेल असे सांगण्यात आले.
– फॅब्रिकेशन कारखानाचालक
जो मिळकतदार नळपट्टी चुकवण्याचा प्रयत्न करत आहे अशा मिळकतदारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. जो नियमित करदाता आहे, त्याला विनाकारण त्रास देऊ नये असा सूर आता मिळकतदार आणि शहरवासीयां मधून उमटत आहे.