मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला कागदपत्रानंतर सर्वरची लागली घरघर….ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येत आहेत तांत्रिक अडचणी
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ३ जून – राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी बनलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला कागदपत्रानंतर सर्वरची घरघर लागलेली दिसत आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेसाठी रहिवासी दाखला उत्पन्न दाखला रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट अशा विविध कागदपत्रांची आवश्यकता असून यामध्ये रहवासी दाखला काढण्यासाठी महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शाळा न शिकलेल्या अशिक्षित महिलांना हा दाखला काढण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य नव्हते त्यामुळे सरकारने काल पुन्हा एकदा नवीन नोटिफिकेशन जाहीर करत योजनेमध्ये दुरुस्ती केली आणि रहिवासी दाखला ऐवजी रेशन कार्ड मतदान कार्ड पर्याय उपलब्ध करून दिला. तसेच ज्याचे रेशन कार्ड केशरी पिवळे आहे त्यांना उत्पन्न दाखला देखील काढण्याची गरज नाही असे देखील जाहीर केले त्यामुळे महिलांनी सुटकेचा निःश्वास विश्वास सोडला.
दरम्यान कागदपत्रानंतर आता महिलांना सर्वरची घरघर लागलेली दिसत आहे. संपूर्ण राज्यभरामधील महिला एकाच वेळी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणार असल्याने सर्वर एरर दाखवत आहे. त्यामुळे महिलांना सर्वरच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जाचक कागदपत्रे शिथिल करण्यात आली मात्र ऑनलाइन मधील तांत्रिक अडचणी डोके वर काढू लागले आहेत त्यामुळे महिलांची मोठी परवड होत आहे. सरकारने ऑनलाईन अर्ज सुरू करण्याअगोदर सर्वर आणि संबंधित तांत्रिक यंत्रणा मजबूत केली पाहिजे असा सुर आता महिलांमधून उमटत आहे.
नारीशक्ती दूत ॲपमध्ये एरर
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने नवे नारीशक्ती दूत ॲप विकसित केले आहे. परंतु सदरच्या ॲपमध्ये अद्यापही अर्ज भरता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या ॲप मध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून त्यामध्ये एरर दाखवले जात आहे. सदरचे ॲप अंगणवाडी केंद्रामधील सेविकांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यास सूचना दिले आहेत त्याप्रमाणे सेविकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे परंतु ॲप सुरू होत नसल्याचे अंगणवाडी सेविकांकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी वाढत असताना दुसरीकडे ॲप मध्ये एरर येत असल्याने अंगणवाडी सेविकांसह महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.