कृतज्ञता मेळाव्यात महाविकास आघाडीने बांधली आगामी विधानसभेची मोट ..

केवळ आणि केवळ तुमच्यामुळे मी खासदार झाले – खा.प्रणिती शिंदे ; कृतज्ञता मेळाव्यात जनतेचे मानले आभार

सोलापूर दि ७ जुलै – सोलापूरकर तुमच्या मताच्या जोरावर मी निवडून आले. जेव्हा लोकसभेची पायरी चढून वर गेले जणू आभाळाला स्पर्श केला असा भास झाला. मतदारांच्या मतांमध्ये ती ताकद आहे. तुमच्यामुळे केवळ तुमच्यामुळेच मी आमदार ची खासदार झाले. त्यामुळे मी तुमचे सर्व मतदारांचे मनापासून आभार मानते. तुमच्या या लेकीकडून कोणती चूक झाली तर कान धरून तिला खाली बसवा. एवढी ताकद तुमच्या मध्ये आहे. असे भावनिक उद्गगार सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांनी काढले. सोलापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळवता आले. काँग्रेसने दहा वर्षानंतर लोकसभेत विजय संपादन केला. याच विजयाचे आभार मानण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदार संघात संपन्न झालेल्या कृतज्ञता मेळाव्यानंतर सोलापूरमधील शेवटच्या टप्प्यातील कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

                याप्रसंगी व्यासपीठावर देशाचे नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्वला शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम , शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, दिलीप माने , शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे , शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी अध्यक्ष अस्मिता गायकवाड , माजी महापौर महेश कोठे , जनार्दन कारमपुरी , मनोहर सपाटे , सुशीला आबुटे , शिवसेनेचे अजय दासरी आदींसह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. कृतज्ञता मेळाव्यात प्रा. अशोक निम्बर्गी , महेश कोठे , चेतन नरोटे , अस्मिता गायकवाड या महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे असे सांगतनाच सोलापूर लोकसभेच्या विजयानंतर सहा विधानसभा जिंकण्याचा मनोरथ व्यक्त केला. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने आणि आपापसात समन्वय साधून काम करण्याचे आवाहन केले.

                    दरम्यान मेळाव्यात माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या मनोगतामधून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. विविध योजना सरकारने प्रलंबित ठेवल्या त्या योजना सुरू करण्यासाठी प्रणिती शिंदे तुम्ही आघाडी घ्या संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करा असे सांगतानाच आडम मास्तर यांनी दबक्या आवाजात लोकसभेच्या जुन्या आठवणीना उजाळा देत सुशीलकुमार शिंदे यांना दिलेले शब्द न विसरण्याचे आवाहन केले. आडम मास्तर यांच्या मनोगतनंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपले भाषण सुरू करत सर्वप्रथम जनतेचे आणि महाविकास आघाडीतील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानले. लोकसभेची निवडणूक भाजपने अस्तित्वाची निवडणूक बनवली होती. काहींनी समोरून पाठिंबा दिला तर काहींनी छुप्या स्वरूपात पाठिंबा दिला. सर्वांसमोर सांगण्यासारखी ही गोष्ट नाही त्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे आणि शक्तींचे आभार. आता प्रणिती  तुम्ही आणि जनता सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे, जनतेसाठी प्रणिती सदैव तत्पर आहे असे सांगून सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले.

                   प्रारंभी कार्यक्रमात मोठा पुष्पहार घालून सर्व मान्यवरांचा एकत्रित विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील विविध नेत्यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा यथोचित सन्मान केला.

आघाडीच्या नेत्यांनी आपापल्या मनोगतामधून व्यक्त केले विधानसभा जिंकण्याचा मनोरथ….

कृतज्ञता मेळाव्यात महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकसभेतील विजयाचे गणित विधानसभेला घातले आहे. महाविकास आघाडी सहा जागा जिंकू शकते. लोक महायुतीला आणि फसव्या सरकारला  वैतागली आहे. लोकांना आघाडी हवी आहे. आपण विधानसभेसाठी तयार रहायला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातील शहर उत्तर , शहर मध्य , शहर दक्षिण, अक्कलकोट , मोहोळ , पंढरपूर मंगळवेढा, या सहा विधानसभा जागेवर महाविकास आघाडीतील उमेदवारांचा विजय निश्चित होईल असा मनोराथ मनामध्ये ठेवून आघाडीतील नेत्यांनी आपापसात समन्वय साधून विधानसभेत काम करण्याचे आवाहन महाविकास आघाडीतील नेत्यांनी  केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *