आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर खा.प्रणिती शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र…
अक्कलकोट रोड एमआयडीसीतील आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची केली विनंती
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१९ मे
सोलापूरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी शासन आणि महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. एमआयडीसी भागात विजेच्या कमी-जास्त दाबामुळे शॉर्ट सर्किट होऊन वारंवार लागणाऱ्या आगींच्या घटनांकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. या भागातील अपुऱ्या पायाभूत सुविधा, रस्त्यांची दुरवस्था आणि अग्निशामक दलाला येणारे अडथळे यामुळे आगीचे रौद्ररूप रोखण्यात अपयश येत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी *खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना पत्र लिहून केली आहे.
दरम्यान, सोलापुरातील टॉवेल कारखान्याला लागलेल्या या आगीत उस्मान मन्सुरी,अनस मन्सुरी, शिफा मन्सुरी, युसुफ मन्सुरी, आशाबानो बागवान, हिना बागवान शेख, सलमान बागवान आणि मेहताब बागवान या आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यापैकी एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. “या दु:खद घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. त्यांच्या कुटुंबियांना या दुखातून सावरण्याची शक्ती ईश्वर द्यावी,” अशा शब्दांत खासदार शिंदे यांनी शोक व्यक्त केला.
विजेच्या समस्येमुळे वारंवार आगी
खासदार शिंदे यांनी सांगितले की, अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना एकाच वीज उपकेंद्रातून नागरी आणि औद्योगिक वसाहतींसाठी वीजपुरवठा केला जातो. यामुळे विजेचा दाब कमी-जास्त होऊन शॉर्ट सर्किटच्या घटना घडतात, ज्यामुळे आग लागते. “यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, पण जीवितहानी झाली नव्हती. आज मात्र आठ जणांचा बळी गेला. तरीही शासन आणि प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत की नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या भागात आग लागण्याच्या घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी खासदार शिंदे यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून तात्पुरत्या स्वरूपात अग्निशामक दलाची गाडी तैनात करण्याची व्यवस्था केली होती. तरीही, या आगीने रौद्ररूप धारण केले. “प्राथमिक सोय असतानाही आग इतकी भयंकर कशी झाली, याची चिंता वाटते,” असे त्या म्हणाल्या. तसेच, रस्त्यांची दुरवस्था यामुळे अग्निशामक गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे येतात, ज्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरते, असे त्यांनी नमूद केले.
विधानसभेत उठवला आवाज, तरीही दुर्लक्ष
खासदार शिंदे यांनी विधानसभेत या समस्येबाबत वारंवार आवाज उठवला आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत त्यांनी अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील आगींच्या घटनांकडे लक्ष वेधले होते. यासाठी डी.पी.डी.सी. 2023-24 च्या निधीतून अग्निशामक केंद्र उभारण्यासाठी 1 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करून महानगरपालिकेकडे वर्ग केला होता. “मात्र, हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यावरून मनपा प्रशासनाचे गांभीर्य दिसून येते,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.या भागातील विद्युत समस्येवर उपाय म्हणून खासदार शिंदे यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीसोबत कारखानदारांची बैठक घेतली होती. त्यातून विद्युत सोयी-सुविधांचा विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मात्र, ऊर्जा विभागाकडून याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. “ऊर्जा खात्याच्या सचिवांशी संपर्क साधल्यानंतरही DPR मंजूर झालेला नाही. शासनाने याला तात्काळ मंजुरी द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.