गारपिटीचा कहर; खासदार डॉ. ज्योती वाघमारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
“एकही शेतकरी वंचित राहणार नाही” — तातडीच्या पंचनाम्यांचे प्रशासनाला सूचना
सोलापूर व्हिजन २७ मार्च
मोहोळ तालुक्यातील येवती–पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
“सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,” असा दिलासा देत त्यांनी हतबल झालेल्या बळीराजाला आधार दिला.

पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षबागा, केळीसह इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची व गोठ्यांची पडझड झाली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर भावना अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
घटनास्थळावरूनच मंत्र्यांशी संपर्क; मदतीची मागणी
परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन खासदार डॉ. वाघमारे यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
मोहोळ तालुक्यातील आपत्तीची सविस्तर माहिती देत त्यांनी तातडीच्या मदतीची मागणी केली.
संबंधित कृषी अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या पाहणी दौऱ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे, माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, भीम वाघमारे, दीपक पाटील यांच्यासह अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नुकसानभरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा करणार”
“शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून मन हेलावले आहे. केवळ पंचनामे करून थांबणार नाही, तर नुकसानभरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पडेल, यासाठी सातत्याने पाठपुरावा करेन. उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच दिलासादायक निर्णय अपेक्षित आहे.”
— खासदार डॉ. ज्योती वाघमारे