मोची समाज युवकांची काँग्रेस भवनसमोर घोषणाबाजी !
शहर मध्य मधून बाबा करगुळे यांना उमेदवारी देण्याची केली मागणी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २१ ऑक्टोंबर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून मोची समाजातील कार्यकर्ते अंबादास करगुळे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोची समाजाचे युवकांनी काँग्रेस भवनच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली. येत्या दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचपार्श्वभूमीवर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने मोची समाजाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान काँग्रेस पार्टीकडून उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच कोणत्या उमेदवाराला संधी मिळेल. याकडे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेस पक्षाच्या वतीने बाबा मिस्त्री यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे समजल्यानंतर मोची समाजाचे युवक आक्रमक भूमिकेत आल्याचे सांगण्यात येत आहे.
मोची समाजाचे काँग्रेस पक्षामध्ये महत्त्वाचे स्थान.
मोची समाजाचे काँग्रेस पक्षामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मोची समाज बांधव स्थापनेपासून काँग्रेस पक्षासोबत आहेत. देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे त्यानंतर आता खासदार प्रणिती शिंदे यांचा विजय मोची समाजामुळे सुकर झाला आहे. त्यामुळे मोची समाजाला एकतरी संधी द्यावी अशी आमची मागणी आहे.
– अंबादास करगुळे, इच्छुक उमेदवार.
लोकसभा विजयात मोची समाजाचा सिंहाचा वाटा
खा.प्रणिती शिंदे यांच्या विजयात मोची समाजाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे यंदा मोची समाजाला उमेदवारी देऊन विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी त्यासाठी केवळ युवकांचे नेते अंबादास करगुळे यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी केली.
– यल्लाप्पा तूपदोळकर, मोची समाज कार्यकर्ते.