महापालिका प्रशासनाची प्लास्टिक विरोधी मोहीम..
बाजारपेठेतील विविध दुकानांची केली तपासणी….!

प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर , दि. ७ सप्टेंबर – सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी गणेश चतुर्थी निमित्त शहरातील महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या टिळक चौक मधला मारुती या बाजारपेठांमध्ये प्लास्टिक विरोधी मोहीम राबवली. सदरच्या मोहिमेत प्रत्येक स्टॉल्स आणि दुकान यांची तपासणी करून प्लास्टिक वापरण्यावर बंदी असल्याचे सांगत दुकानाची पाहणी केली. त्याच पद्धतीने महापालिकेच्या वतीने वापर परवाना काढण्यात आला आहे का किंवा नाही याची देखील तपासणी यावेळी करण्यात आली.
महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी तसेच बाजारपेठात प्लास्टिक विरोधी मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक वापरणाऱ्या संबंधित दुकानदार आणि घेऊन जाणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
वाढत्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महापालिकेने खबरदारीच्या दृष्टीकोनातून सदरची कारवाई सुरू केली आहे. सणासुदीच्या काळामध्ये अशा प्रदूषणाचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. त्यामुळे वातावरण आणि परिसर अस्वच्छ आणि प्रदूषित होत असून महापालिका आयुक्त तसेच उपायुक्त यांच्या आदेशानुसार सदरची मोहीम हाती घेतल्याचे यावेळी स्वच्छता निरीक्षक पथकाने सांगितले.
शहरातील मधला मारुती टिळक चौक बाजारपेठात स्वच्छता निरीक्षक पथक तैनात.
सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठा मांडल्या जाणाऱ्या मधला मारुती आणि टिळक चौक येथे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता निरीक्षक पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. एका पथकामध्ये पाच स्वच्छता निरीक्षक आणि इतर कर्मचारी यांचा सहभाग आहे. प्रत्येक दुकानदार आणि स्टॉल्सधारक यांच्याकडून परवाना तसेच प्लास्टिक पाहणी करण्यात येत आहे. प्लास्टिक आढळल्यास किंवा विनापरवाना स्टॉल्स सुरू ठेवल्यास संबंधित दुकानदार आणि मालकावर कारवाई करण्यात येत आहे.
प्लास्टिक वापर थांबवून कटू कारवाई टाळावी…
गणेशोत्सवकाळ आणि आगामी सणासुदीच्या काळामध्ये सदरची प्लास्टिक विरोधी मोहीम सुरूच राहणार आहे. त्यामुळे दुकानदारांनी तसेच ग्राहकांनी देखील प्लास्टिकचा वापर थांबवावा आणि कटू कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात येते आहे.
– शकील नल्लाबंदू , स्वच्छता निरीक्षक सोलापूर महानगरपालिका.
यावेळी स्वच्छता निरीक्षक शकील नल्लामंदू , विठोबा शिंदीबंदे , प्रेम मस्के , हमीद हिरोली , उत्तम बनसोडे , कर्मचारी सोमनाथ सिद्धगणेश , शिवाजी कांबळे , पांडू दुपारगुडे पथक पाहणी करत असल्याचे दिसून आले.