वसुंधरा संमेलनात झाला पर्यावरण संवर्धनाचा जागर…
पर्यावरण अभ्यासकांची व्याख्याने….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २८ सप्टेंबर – माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पहिले वसुंधरा संमेलन शुक्रवारी उत्साहात पार पडले. पर्यावरण संवर्धनासाठी महापालिका प्रशासन आणि शासन पातळीवर वेगवेगळे प्रयत्न होत आहेत, आता सर्व नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील झाले पाहिजे असे आवाहन पर्यावरण अभ्यासकांनी केले.
ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक बी.एस. कुलकर्णी यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून वसुंधरा संमेलनाचे उद्घाटन झाले. या संमेलनाचे अध्यक्षस्थान सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी भूषवले .या प्रसंगी उपायुक्त तैमूर मुलाणी,उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखापाल रुपाली कोळी, मनीष भिष्णुरकर, सर्पतज्ञ नीलमकुमार खैरे, वनरक्षक रमेश खरमाळे,जल अभ्यासक रजनीश जोशी, श्रीमती अर्चना मोरे, श्रीमती गार्गी गीध, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत-पाटील, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सत्रात सोलापुरात पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला.
महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले म्हणाल्या, सोलापूर महापालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. धर्मवीर संभाजी महाराज तलाव प्रदूषण मुक्त करण्यात आला आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. सोलापूर शहर धुळमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली. यामध्ये रस्त्यांचे नवे थर अंथरणे, ग्रीन वॉल बांधणे, हिरवळ व वॉटर करटेन्स तयार करणे, सी. एन.जी गाड्या घेणे अशा विविध उपयांची माहिती दिली. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक बी.एस. कुलकर्णी म्हणाले, धर्मवीर संभाजी महाराज तलाव हे सोलापूरचे फुफुस आहे. हे तलाव प्रदूषणमुक्त राहण्यासाठी महापालिका प्रशासन विभागाने सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाकडून आता विविध उपायोजना केल्या जात आहेत ही चांगली बाब आहे.
तत्पूर्वी कार्यक्रमांचे प्रास्ताविक सोलापूर महापालिकेचे उपायुक्त तैमुर मुलाणी यांनी केले. तर सूत्रसंचालन अश्विनी मोरे वाघमोडे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त ज्योती भगत-पाटील यांनी मांडले. पहिल्या सत्रामध्ये ज्येष्ठ सर्पतज्ञ नीलीमकुमार खैरे यांनी सापांविषयीच्या रंजक गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितल्या. नैसर्गिक साखळी टिकून राहण्यासाठी सापांसह सर्वच घटक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्नर वनविभागातील वनरक्षक, पर्यावरण अभ्यासक रमेश खरमाळे यांनी पर्यावरण संवर्धनातील माझा सहभाग या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी कृतीशील व्हायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या आयुष्यामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पाणी जपून वापरायला हवे. नद्या आणि इतर जलाशय प्रदूषण मुक्त व्हायला हवीत. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे आवाहन करताना ज्येष्ठ जलतज्ञ रजनीश जोशी यांनी पाण्याचे महत्त्व पटवून दिले.
मिशन शून्य कचरा या विषयावर पुण्याच्या मिशन शुन्य कचरा अभियानाच्या प्रमुख अर्चना मोरे यांनी संवाद साधला. त्यानंतर ग्रीन फाउंडेशन मुंबई येथील गार्गी गीध यांनी विघटनशील प्लास्टिक या विषयावर मार्गदर्शन केले.या प्रसंगी पर्यावरण विभागाचे अधिकारी अक्षय मोरे, पशुवैद्यकीय अधिकारी सतीश चौगुले, उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे, स्वप्नील सोलनकर, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार यांच्यासह पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.