– शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद कायम….!
– स्मार्ट सिटीतील रस्त्यांवर जनावरांचा वावर ठरतोय अपघाताला आमंत्रण ?
– महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २३ सप्टेंबर – सोलापूर शहराच्या स्मार्ट रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मोकाट जनावरांचा वावर रस्त्यांवर वाढल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. स्मार्ट सिटीतील स्मार्ट रस्त्यांवर हे चित्र नेहमीच दिसून येत आहे. याकडे महापालिका प्रशासन आणि संबंधित कोंडवाडा विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात नेहमीच मोकाट जनावरे कचराकुंडीच्या बाजूने फिरताना दिसतात. रस्त्याच्या कडेला नेहमीच या मोकाट जनावरांनी ठिय्या मांडलेला असतो. असेच चित्र शहरातील श्रीरूपाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर दिसत आले. या रोडवर नेहमीच वाहनांची तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते. मोठमोठी वाहने या रोडवरून जात असतात. अशावेळी कळपाने फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी अपघात सुद्धा घडून येत आहेत.

दरम्यान शहरातील विविध रस्त्यांवर विशेषतः मार्केट परिसरात या जनावरांचा उच्छाद वाढलेला आहे. मात्र याकडे महापालिका प्रशासनाच्या कोंडवाडा विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे. पूर्वी वेळोवेळी मोकाट जनावरे पकडली जायची. आणि जनावरांच्या मालकांकडून दंड आकारला जात असे परंतु, सद्यस्थितीमध्ये सर्वत्र जनावरांचा वावर वाढल्याने मोकाट फिरणाऱ्या जनावरांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली जात नाही. सदरची जनावरे पकडली जातात का नाहीत ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महापालिका प्रशासनाचे नवीन गुरे वाहक वाहन आहे कुठे?
महापालिका प्रशासनाने नुकतेच नवीन पद्धतीचे गुरे वाहक वाहन सेवेत रुजू केले आहे. त्या वाहनावर चालक तसेच कर्मचारी नेमण्यात आले आहेत. परंतु सदरचे वाहन कोणत्या भागात कारवाई करते, याचा कोणताच थांगपत्ता लागत नाही. पूर्वीचे वाहन मोठ्या आकाराचे होते, त्यामुळे कारवाई करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. परंतु आता नवीन छोट्या आकाराचे वाहन महापालिकेच्या ताफ्यात रुजू झाले आहे. परंतु कारवाई होते का ? झाली तर कोठे आणि केव्हा ? असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
नवरात्रोत्सवा निमित्त कोंडवाडा विभागाने लक्ष देण्याची गरज…
नवरात्रोत्सवानिमित्त ग्रामदेवता श्रीरूपाभवानी देवी मंदिराकडे जाणाऱ्या चारही रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी असते. अशावेळी कळपाने फिरणारी मोकाट जनावरे उसळून उच्छाद मांडू शकतात. यामुळे एखादी अप्रिय घटना घडू शकते. त्यामुळे संबंधित कोंडवाडा विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
– सुरेश तळवलकर, नागरिक.