मक्तेदाराचे निकृष्ट काम कासव गतीने : कामातील संथगतीच्या कामामुळे धोका वाढला
महापालिका शाळांतील विद्यार्थी शिक्षण घेतायत धोकादायक इमारतीत…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ८ जुलै – सोलापूर शहरातील महापालिकेच्या शाळा पडक्या आणि धोकादायक अवस्थेत आल्याने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. असे विदारक चित्र शहरातील बाळीवेस परिसरातील शाळांमध्ये दिसत आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून अशा धोकादायक इमारतीत अध्ययन अध्यापनाचे कार्य करावे लागत आहे. शाळेतील विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेहमी धोकादायक अवस्थेतील इमारतींमध्ये जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत आहेत. कधी कुठला भाग कोसळेल याचा काही नेम नाही. शाळेतील अनेक भागात जीर्ण झालेले, भिंती , कठडे, उघड्यावर आलेल्या स्लॅबच्या सळया , मोडकळीस आलेले दरवाजे , इतरत्र पडलेले दारूच्या बाटल्या, अशा एक ना अनेक समस्या जीवघेण्या ठरत आहेत. महापालिका प्रशासनाने शाळेच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून बांधकाम करणे आवश्यक असताना तसे न करता मक्तेदाराला शाळेचे काम सोपवून हात झटकले आहेत. शाळेचे बांधकाम तसेच वर्ग खोलीतील फरशीकरण , किरकोळ डागडुजी अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि संथगतीचे सुरू आहे. यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे धोकादायक ठरत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. शाळेच्या नूतनीकरणासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित मुख्याध्यापकांनी पत्रव्यवहार आणि प्रस्ताव दाखल केला आहे. त्यानंतर या कामकाजाला सुरुवात झाली परंतु मे महिन्यात सुरू झालेले काम अद्यापही सुरूच आहे. तेही निकृष्ट दर्जाचे आणि संथगतीने सुरू असल्याने कामाची शाश्वती देणे अवघड झाले आहे. पडक्या आणि धोकादायक अवस्थेतील शाळा जणू मृत्यूचेच आमंत्रण देत आहे का असे दयनीय आणि धक्कादायक चित्र दिसत आहे.
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष ?
सोलापूर महानगरपालिकेच्या विविध शाळांची अवस्था धोकादायक स्थितीत आली आहे. ज्या शाळांची अवस्था अशा अतंत्य धोकादायक बनलेली असताना त्याची पाहणी करून नूतनीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा होत आहे का? मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार नूतनीकरणाच्या कामाचे प्रस्ताव पाठवला आहे. त्यानंतर कामकाज सुरू झाले परंतू कामाचा दर्जा निकृष्ट आणि सुमार राहिलेला आहे. याकडे प्राथमिक शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे का असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमी दडखाली राहतात. शाळेची अवस्था पाहिली असता शाळा कधी पडेल अशी झालेली आहे. तरी देखील महापालिका प्रशासन , प्राथमिक शिक्षण मंडळ आणि शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. आमची मुलं या शाळेत शिक्षण घेताना कोणती अप्रिय घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहणार?
संतप्त पालक
सदरच्या इमारतीमध्ये पूर्व प्राथमिक , प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा अशा तिन्ही स्तरावरील वर्ग भरतात. शाळेची जीर्ण इमारत , अपुऱ्या भौतिक सुविधा आणि तळीरामांचा वाढेलेला हैदोस अशा एक ना एक समस्या डोकेवर काढत आहे. याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विस्तीर्ण असे मैदान आणि भव्य इमारत दयनीय अवस्थेत आल्याने महापालिका प्रशासन आणि प्राथमिक शिक्षण मंडळ प्रशासन यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.