उड्डाणपूल ते पाणीप्रश्नः दोन्ही ‘देशमुखांची’ नागपुरात हालचाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली चर्चा

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.११ डिसेंबर
हिवाळी अधिवेशनात सध्या सोलापूरच्या प्रश्नांना वेग देण्यासाठी आ. विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची संयुक्त धडपड पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरातील प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक बैठकीत एकत्र दिसणारी ही देशमुखांची जोडी आता नागपूर अधिवेशनातही सक्रिय असून, सोलापूरच्या प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला आहे.

गेल्या काही महिन्यापासून आ. विजय देशमुख आणि सुभाष देशमुख या दोघांची जवळीकता वाढली आहे. आ. सुभाष देशमुख यांनी आमच्या दोघात विकासाची स्पर्धा आहे, आम्ही दोघांनी गेल्या 10 वर्षात सर्वाधिक निधी सोलापूरसाठी आणल्याचे सांगितले होते. आता या दोघांची एकजूट नागपूर येथील अधिवेशनातही दिसत आहे. अधिवेशनादरम्यान आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेऊन सोलापूर शहरातील महत्त्वाच्या कामांचा तपशीलवार आढावा सादर केला. शहरात होणारे दोन्ही उड्डाणपूल प्रकल्प, यासह पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डापुलाचे प्रकल्प मार्गी लागतील तसेच पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक तेवढा निधी पुरवला जाईल, असे आश्वासन दिले.

याशिवाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचीही भेट घेऊन सोलापूर जिल्ह्याशी निगडित विविध प्रशासनिक, पायाभूत व विकास कामांवरही या दोन्ही आमदारांनी पाठपुरावा केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे उपस्थित होते.