रोहित पवार कोण ? हे आता कळाले असेलच, नाव न घेता रोहित पवारांचा टोला
सन्मानाने वागणूक द्याल तर महाविकास आघाडी ; अन्यथा स्वबळाचा नारा – आमदार रोहित पवार
आगामी महापालिका जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मांडली भूमिका..
सोलापूरच्या क्रिकेट वैभवासाठी राजकीय नेत्यांनी एकत्रित येण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२१ मे
सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला येत्या चार महिन्यांमध्ये महापालिका जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दिवाळी हंगामात महापालिका निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष निवडणुकांच्या अनुषंगाने सज्ज झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर व तसेच राज्य पातळीवर महाविकास आघाडी करून लढायचे की स्वबळावर लढायचे याबाबत स्पष्ट भूमिका मांडताना रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे काँग्रेस हा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने लहान भावाला जर सन्मानाने वागणूक दिली. तर महाविकास आघाडी होऊ शकते. मात्र मोठ्या भावाने मानसन्मान न देता, कुरघोडी केली तर आम्ही देखील कुरघोडी करण्यास सज्ज आहोत. आता बऱ्याच कालावधीनंतर रोहित पवार कोण आहेत हे माहीत झाले असेल, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून रोहित पवार सर्वांना परिचित आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये हे सर्वांना दाखवून देऊ. असा टोला नाव न घेता रोहित पवार यांनी महाविकास आघाडी अंतर्गत नेते मंडळींना लगावला आहे.
दरम्यान, रोहित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत संपूर्ण राज्यभरामध्ये चालवल्या जाणाऱ्या सामन्यांबाबत माहिती देण्यासाठी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सर्वप्रथम त्यांनी क्रिकेट संदर्भातील माहिती माध्यमांना दिली. क्रिकेटनंतर त्यांनी राजकीय पिचवर त्यांनी तुफान फटकेबाजी केली. महाविकास आघाडी, स्वपक्षीय तसेच विरोधकांना देखील खरे खोटे सुनावले. महापालिका डोळ्यासमोर ठेवून आमचा पक्ष व पक्षातील वरिष्ठ आणि नवीन कार्यकर्ते कार्यरत आहे. एकमेकांवर कुरघोडी न करता, महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि शिवसेना यांनी देखील सहकार्याची भावना ठेवून महापालिकेवर आपली सत्ता येण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. यापूर्वी सोलापूर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे काँग्रेस हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील इतर पक्षांना मानसन्मानाने वागणूक द्यावी. जागा वाटपात कोणताही खोडा घालू नये, ३० ते ४६ जागा या मित्र पक्षांना द्याव्यात. जेणेकरून आमच्या पक्षांमधील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे काँग्रेसने सहकार्याची भावना ठेवून महाविकास आघाडी अंतर्गत सदरची निवडणूक लढवावी, असा सूचक इशारा आमदार पवार यांनी दिला. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, कार्याध्यक्ष सरफराज शेख, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण लता ढेरे, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश ! मात्र भाजप गप्प
छगन भुजबळ यांना यापूर्वीच मंत्रिमंडळात घेणे अपेक्षित होते. मात्र भाजप पक्षातील नेत्यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. परंतु आता अनायसेने वेळ जुळून आल्याने छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ घेता आली.मात्र विरोधी पक्षात असताना भाजपने छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र महायुती सरकारमध्ये आल्यानंतर भुजबळ यांच्यावर भाजप पक्षाने चकार शब्द काढलेला नाही. तसेच भुजबळ यांनी देखील ओबीसी आरक्षणावर भाजप विरोधी वातावरण निर्माण केले होते. परंतु ते देखील ओबीसी आरक्षणावर कोणतेही वक्तव्य करत नाहीत. वास्तविक पाहता राजकारण व अर्थकारणासाठी सर्व घडामोडी घडलेले आहेत हे दिसून येते. असे देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
सोलापूरच्या क्रिकेट वैभवासाठी राजकीय नेत्यांनी एकत्रित यावे
सोलापूर शहराच्या क्रीडाविश्वात वैभवाची भर पडणार आहे त्यासाठी राजकीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून सोलापूरच्या क्रीडा विश्वाच्या वैभव साठी एकत्र यावे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशन यांच्या वतीने सोलापुरात राज्य पातळीवरील सामने खेळवले गेले आहेत आणि यापुढे देखील खेळवले जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोलापूरमध्ये गुंतवणूक करणार आहे. क्रिकेट मैदानासाठी २५ एकर जागेची आवश्यकता आहे. सरकारी किंवा खाजगी मालकीची जागा असल्यास एमसीए आणि संबंधित जागामालक यांच्या सोबत तीस वर्षांचा करार करून सोलापूरसाठी आणि सोलापूर मधील क्रिकेटपटूंसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याने त्याला सहाय्यक ठरेल. त्यामुळे विविध राजकीय नेत्यांनी राजकीय पार्श्वभूमी बाजूला ठेवू नये सोलापूरच्या क्रिकेट वैभवसाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन देखील आमदार रोहित पवार यांनी केले.