सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी आमदार देवेंद्र कोठे विधानसभेत आक्रमक
ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर ईशान्य प्रवेशद्वार अतिक्रमणमुक्त करून सुशोभीकरणासाठी अतिरिक्त १० कोटी निधीची आमदार देवेंद्र कोठे यांनी केली मागणी

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे बुधवारी सोलापूरच्या पाणीपुरवठ्याबाबत चांगलेच आक्रमक झाले. सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तत्वतः मंजुरी दिलेल्या ८९२ कोटी रुपयांच्या कामाची निविदा लवकरात लवकर काढण्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे आग्रह धरला. तसेच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्य प्रवेशद्वारा समोरील अतिक्रमण काढून हा परिसर सुशोभित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणीही आमदार कोठे यांनी यावेळी केली.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, समांतर जलवाहिनी पूर्ण होण्यासाठी मागील हिवाळी अधिवेशनात मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. परंतु सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या, अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था यासाठी ८९२ कोटी रुपयांची आवश्यकता होती. या मागणीला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. ७ मार्च रोजी झालेल्या बजेट अधिवेशनाच्या काळात याबाबत बैठक आयोजित करून हा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला तांत्रिक मान्यता देखील मिळाली. परंतु हा हे काम कोणत्या हेडमधून काम मंजूर करावे याबाबत वित्त सचिव आणि अन्य सचिवांमध्ये मतमतांतरे होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहर हे महत्त्वाचे शहर असून ही पाणीपुरवठा योजना कोणत्याही परिस्थितीत करायची आहे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री जयकुमार गोरे देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याकामाची निविदा आगामी आठ दिवसात काढण्याचे आश्वासन मुख्य सचिवांनी दिलेले आहे. मात्र प्रथम आणि दुसऱ्या टप्प्यातील निधीची तरतूद लवकरात लवकर व्हावी, जेणेकरून सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठीच्या व्यवस्थेचे काम वेळेत पूर्ण होईल, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.
त्याचबरोबर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी १२ व्या शतकात लोकसहभागातून बांधलेला तलाव आणि कालांतराने तेथे बांधण्यात आलेले मंदिर हे अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणे आहे. या मंदिराच्या ईशान्य प्रवेशद्वाराला असलेल्या लक्ष्मी मार्केट परिसरातील अतिक्रमण काढून हे प्रवेशद्वार आणि हा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने द्यावा. सोलापूरला लागून असलेल्या अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर अशा मंदिरांना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. श्री सिद्धरामेश्वर मंदिर आणि परिसराचा विकास झाला तर हे भाविक सोलापुरातही मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात. त्यामुळे शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केली.
पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचे आमदार देवेंद्र कोठे यांनी कौतुक करत मानले आभार
सोलापूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत. त्याकरिता बुधवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना सोबत घेऊन नागपुरातील हैदराबाद हाऊस (मुख्यमंत्र्यांचे कार्यालय) येथील कार्यालयात मुख्य सचिवांची भेट घेतली. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. यानंतर मुख्य सचिवांनी गोविंदराज यांना याबाबत निर्देश दिले. यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी गोविंदराज यांचीही भेट घेतली. तसेच महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनाही याबाबत सूचना केल्या. पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरचा पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लावण्यासाठी करत असलेल्या धडपडीबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले.