सरकारला पैसे कमी पडल्यास राज्यपालाचा चाळीस एकराचा बंगला विक्री करावा – आ. बचू कडू यांचा सरकारला अजब सल्ला…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २९ जुलै – राज्यातील तिघाडी सरकार मनमानी कारभार करत आहे. खऱ्या अर्थाने जो लाभार्थी आहे त्याला आर्थिक मदतीची गरज असताना त्याला मदत दिली जात नाही. उलट जे लोक चांगले आहेत शारीरिक दृष्ट्या कमावणारे आहेत, अशांना सरकार पैसे वाटप करत आहेत. अंध, अपंग , दिव्यांग यांना विविध योजनांची खरी गरज असताना त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचला जात नाही. त्यामुळे जर सरकारकडे या लोकांना देण्यासाठी पैसे नसतील तर मुंबईमध्ये राज्यपालाचा चाळीस एकरातील भला मोठा बंगला आहे. तो विक्री करावा आणि त्यातून येणारे करोडो रुपयांच्या निधीच्या माध्यमातून शेतकरी , कष्टकरी कामगार , दिव्यांग, अंध , अपंग या बांधवांना योजनेचा पैसा द्यावा असा अजब सल्ला सोलापुर दौऱ्यावर आलेल्या आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
दरम्यान येत्या ९ ऑगस्ट २०२४ रोजी सरकारच्या शेतकरी , कष्टकरी आणि दिव्यांग बांधवांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर याठिकाणी भव्य दिव्य असा दोन ते तीन लाखांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये शेतकरी कष्टकरी दिव्यांग तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले. सरकारला या विविध प्रश्नांचा विसर पडला असून यावर प्रहार जनशक्ती पक्ष ठाम भूमिकेत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामकाज सुरू केले आहे. राज्यभरात एकूण २५ विधानसभेच्या जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर सरकारने आमच्या १६ मुद्द्यांवर एकमताने निर्णय घेतला तर विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊ असे देखील बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.
शेतकरी कष्टकरी यांच्या घामाला दाम नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही. दिव्यांग तसेच अपंग बांधवांना वेळोवेळी निधी दिला जात नाही. अशा विविध प्रश्नांचा पाढा यावेळी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी वाचून सरकारला जाब विचारला जाणार आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि मेळावा घेण्यात येत आहे. सोलापूर दौऱ्यानंतर लातूर आणि मराठवाडा दौऱ्यात देखील हे विविध प्रश्न आणि १६ मुद्दे सरकार समोर उपस्थित केले जाणार आसून यावर गांभीर्याने विचार न केल्यास अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन राज्यात सुरच राहील असा इशारा देण्यात आला आहे.
महायुती किंवा महाआघाडी आमचे १६ मुद्दे मान्य करतील त्याच्यासोबत आम्ही जाऊ….
राज्यातील महायुती सरकार मनमानी कारभार करत असल्याने सरकारमध्ये राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर महायुतीने आमचे १६ मुद्दे मान्य केले तर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. किंवा सत्तेत बदल झाला आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर महाविकास आघाडीने देखील आमच्या या सोळा मुद्द्यांचा विचार करावा आम्ही त्यांच्यासोबत राहू.
– आ. बचु कडू , प्रहार जनशक्ती पक्ष.
शासकीय विश्रामगृहात आलेल्या दिव्यांग बांधवांची जाणून घेतली समस्या……
आमदार बच्चू कडू सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. हे समजल्यानंतर सोलापूर शहर तसेच आसपासच्या गावातून असंख्य दिव्यांग ,अपंग ,अंध बांधव आपल्या विविध मागण्यांचे पत्र घेऊन शासकीय विश्रामगृह याठिकाणी दाखल झाले होते. पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर त्यातील एका दिव्यांग बांधवाने थेट बच्चू कडू यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. सदरची समस्या आमदार बच्चू कडू यांनी जाणून घेतली. तसेच यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. या पत्रकार परिषदेस अजित कुलकर्णी जमीर शेख आदींसह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.