पालकमंत्री जया भाऊंच्या बैठकीने उत्साह संचारले ; कार्यकर्ते पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवणार तळागाळापर्यंत

भाजपा उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवावीत पक्षाची ध्येयधोरणे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आवाहन : भाजपाच्या उमेदवारांची बैठक

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.४ डिसेंबर

महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत भाजपाची ध्येय धोरणे संपर्काच्या माध्यमातून पोहोचवावीत, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

महापालिका निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे उमेदवारांच्या बैठक घेऊन चर्चा केली. याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. अशावेळी भाजपाच्या उमेदवारांनी प्रभागांमध्ये अधिकाधिक व्यक्तींशी संपर्क साधून भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याचे आवाहन करावे. भाजपाने राज्यात आणि केंद्रात केलेल्या विकासकामांची तसेच सोलापूर शहरात झालेल्या धुळमुक्त सोलापूर, पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटी रुपये, विमानसेवा, आयटी पार्क, लाडकी बहीण योजना अशा विकासकामांची माहिती नागरिकांना भेटून द्यावी. केंद्रात, राज्यात सत्ता असल्याने सोलापूरला भरघोस निधी देता येईल. राज्य तसेच केंद्राच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र गट तयार करावेत. सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय रहावे. मतदार यादीतील प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवार आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोहचावे.

यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. श्री. देशपांडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना बूथरचना, संपर्क, हिशोब प्रचार आदी विषयात नेटके कार्य करावे, असे सांगितले. सोलापूर महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी लागणारी सर्व तांत्रिक प्रक्रिया उमेदवारांनी पूर्ण करावी. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शहरवासीयांनी भाजपच्या पाठीशी रहावे यासाठी उमेदवारांनी प्रयत्न करावेत, असेही श्री. देशपांडे याप्रसंगी म्हणाले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने रणनीती आखत उमेदवारांसह कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नवी यंत्रणा उभी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप सर्वच आघाडीवर मागे पडत असल्याचे दिसून आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बालाजी सरोवर येथून सूत्र हलविण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही झालेली बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सर्वच पदाधिकाऱ्यांनी झाले गेल विसरून नव्या दमाने निवडणूक जिंकण्याचा चंग बांधलेला दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *