मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी भेट...
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिनांक:- लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर १५ जून २०२४ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाने महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली.
प्रतिनिधीमंडळात डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, मा. आ. नरसय्या आडम, मा. आ. जे. पी. गावीत, आ. विनोद निकोले, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, व डॉ. सुभाष जाधव हे होते.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि त्यातील मा. श्री. शरद पवार यांच्या असामान्य योगदानाबद्दल माकपच्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
लोकसभा निवडणुकीत माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे, आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षांचे शरद पवार आणि जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केले.
आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत ५५ मिनिटे चर्चा केली. माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या १२ विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली. यासंबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले.दूध प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी प्रकर्षाने व्यक्त केली. येत्या विधानसभा सत्रावर कामगारांच्या मोर्चाची चर्चा झाली.महाविकास आघाडीच्या इतर सर्व प्रमुख नेत्यांना माकपचे प्रतिनिधीमंडळ लवकरच भेटणार आहे.