विधानसभेसाठी माकप सज्ज !
कार्यालयात झेंडे, पोस्टर लावण्यास झाली सुरुवात..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर,दि.२४ऑक्टोंबर – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या तयारीत गुंतल्याचे चित्र दिसत आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघ लढवण्याचा निर्धार करत कामगारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार आडम मास्तर यांच्या माकप कार्यालयात निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. कार्यालयात झेंडे, पोस्टर लावण्यास सुरुवात झाली असून, मास्तर स्वतः प्रत्येक कामात जातीने लक्ष घालत असताना दिसत आहेत.

दरम्यान दत्तनगर येथील त्यांच्या कार्यालयात सर्व कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केलेली दिसून येत आहे. लाल झेंडे तसेच आडम मास्तर आणि सिताराम येचुरी यांचे विविध पोस्टर्स लावण्यात येत आहेत. यासाठी कार्यकर्ते दिवस रात्र कार्यरत असताना दिसत आहेत. तसेच विविध परवानगी काढणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, वाहन परवाना, पदयात्रा आणि जाहीर सभा यांची परवानगी घेणे, असे विविध कार्यात कार्यकर्ते व्यस्त झालेले दिसत आहेत.

विधानसभा निवडणूक लढवून ती जिंकण्याचा निर्धार

कामगारांचा बुलंद आवाज म्हणून परिचित असणारे माजी आमदार अडम मास्तर यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाड्यात आपले नशीब आजमवार आहेत. तरुण कार्यकर्त्यांच्या फळी सोबत सत्ताधारी पक्षाला शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कामगार आणि शेतकरी यांची जोड घेऊन सदरची निवडणूक लढवून जिंकण्याचा निर्धार यावेळी केला जात आहे.
– अनिल वासम, माकप कार्यकर्ते