छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाली ऐतिहासिक सभा….
सोलापूर व्हिजन
मराठा समाज आरक्षणाचे लढवय्या नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे आज सोलापुरात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस मराठ्यांचा अक्षरशः जनसागर लोटला होता. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाखो मराठा बांधव अक्षरशः पाऊस असतानाही एकवटले होते. तर इतका वेळ थांबूनही जरांगे पाटलांनी आपले विचार दीर्घकाळ भाषणातून मांडावेत अशी अपेक्षाही उपस्थित मराठा बांधवांनी व्यक्त केली. दरम्यान, सोलापूरच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहिलीच जाहीर सभा जरांगे पाटील यांनी गाजविली.
जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जेसीबीद्वारे पुष्पहार घालून जंगी स्वागत केले. यावेळी टाळ्यांच्या गजरात आणि घोषणाबाजी केल्याने अवघा परिसर दणाणून गेला होता. लाखो लोकांच्या उपस्थिती पाहून जरांगे पाटील यांनी तब्बल दीड तासांपर्यंत भाषण केले आणि राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील पुढाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. तर आगामीविधानसभा निवडणुकीत मराठा समाज स्वतंत्रपणे लढाई लढणार असल्याचे सांगून येत्या २९ ऑगस्टच्या जाहीर सभेत आपण घोषणा करणार असल्याचे सांगितले. एकंदरीत, जरांगे पाटील यांनी विधानसभेचे रणशिंगच फुंकले असून, मराठा सम ाजाने या निवडणुकीत १०० टक्के एकगठ्ठा मतदान करण्याचेही त्यांनी आवाहन केले.
मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीची सुरूवात सोलापूरहून जरांगे पाटील यांनी केली असून, नाशिक येथे या रॅलीची सांगता होणार आहे. तर २९ तारखेला आगामी निवडणुकांसाठी ध्येयधोरण ठरविण्यात येणार आहे. लाखो मराठा बांधव व भगिनींसाठी सकल मराठा समाज समन्वयकांनी नाष्टा पाकीट आणि पाण्याची उत्तम सोय केली होती आणि जाहीर सभेनंतर स्वयंसेवकांनी स्वच्छता करून स्वच्छतेचा मंत्रही दिला.
तत्पूर्वी पारंपारिक हलगी आणि तुतारीचा निनाद सर्वत्र घुमू लागला होता. क्रेनवरती भलामोठा हार , डोक्यावर भगवी टोपी , गळ्यात भगवा गमछा , हातात छत्रपती शिवाजी महाराज आणि जरांगे यांचे कटआऊट घेऊन मुखी जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा घोषणा देत रॅली आणि सभेत मराठा आरक्षण मिळविण्यासाठी समाज बांधव एकत्रित आले होते. यावेळी सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांना पाणी बॉटल आणि नाष्ट्याचे पॅकेट आयोजकांकडून देण्यात आले. पोलीस प्रशास नाकडून सभेकडे येणारे सर्व रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहराचे मुख्यप्रवेशद्वार जुना पुणे नाका येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात येणारे वाहन अडवून वाहने पार्किंग करण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात होत्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
एसटी बसेस एन्ट्रीगेटसह , टपऱ्या केले बंद , शहराच्या मुख्य प्रवेशद्वार जुना पुणे नाका पोलीसांचा बंदोबस्त…
मराठा आरक्षणावरून संघर्ष योद्धा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची रॅली आणि भव्य सभा संपन्न झाली. या सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगून एसटी महामंडळाच्या बसेसना शहरातून दिली जाणारी एन्ट्री बंद करून सम्राट चौक येथून एन्ट्री आणि आऊट एकाच ठिकाणाहून करण्यात आली होती. बस स्थानक परिसरात असणारे सर्व कॅन्टीन टपऱ्या बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. सोलापूर जिल्ह्यातील जे मराठा बांधव सभेसाठी उशिरा
आले होते. त्यांना पुणे हायवेवरच आपापली वाहन लावून शहरात प्रवेश दिला गेला.
मराठा बांधवांना पाणी बॉटल आणि फूड पॅकेटचे नियोजन…

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला येणाऱ्या प्रत्येक मराठा समाज बांधवाला आयोजक मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने फूड पॅकेट आणि पाणी बॉटलचे नियोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यांवर विविध ठिकाणी फूड पॅकेटचे स्टॉल थाटण्यात आले होते. शहरातून जाणाऱ्या प्रत्येक मराठा समाज बांधवांना फूड पॅकेट आणि पाणी बॉटल देण्यात आले.
एसटी प्रवाशांना पायपीट करत डोक्यावर सामान घेऊन एसटी स्टँड गाठावे लागले…….
एसटी बसेस बसस्थानक पर्यंत जात असल्याने अनेक महिला प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. काही एसटी बसेस पुना नाका ब्रिजवरच थांबवल्या गेल्या. तर काही एसटी बसेस सम्राट चौक या ठिकाणी थांबवल्या गेल्या त्यामुळे प्रवाशांना शहरात जाण्यासाठी पायपीट करावी लागली. यावेळी एसटी प्रशासनाने प्रवाशांना बस स्थानकमध्ये येण्या आणि जाण्यासाठी मागील प्रवेशद्वाराचे अवलंब करण्याचा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना डोक्यावर सामान घेऊन एसटी स्टँड गाठावे लागले.
मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या……….
संघर्षयोद्धा मराठा नेते मनोज जरांगे पाटील सोलापुरात दाखल झाले. त्यावेळीं रॅली मार्गावर मराठा समाज बांधवांच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या साकारण्यात आल्या होत्या. रांगोळीच्या पायघड्यांनी यावेळी जरांगे पाटील यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.