महायुती लढणार महिला सक्षमीकरण मुद्द्यांवर ;
पत्रकारांच्या प्रश्नांवर युतीच्या नेत्यांची उडाली भंबेरी !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. १८ ऑक्टोंबर – राज्यातील महायुती मधील घटकपक्ष भाजप, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि रयत क्रांती संघटना, शेतकरी संघटना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीची आपली भूमिका मांडली. काम हीच महायुतीची ओळख असल्याचे सांगत आपले रिपोर्ट कार्ड सादर केले. यात सर्वाधिक मार्केटिंग हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी शिवसेना सचिव संजय मिशिलकर, भाजप अध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार, शिवसेना शहर प्रमुख मनोज शेजवाळ, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजप नेते मनिष देशमुख, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अनंत जाधव, वैभव गंगणे, प्रमोद भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एक ना अनेक प्रश्नांच्या फैरी झाडल्या, यावेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या फैरीने युतीच्या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली. गत लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर प्रश्न उपस्थित करताना या विधानसभा निवडणुकीत तरी महायुती म्हणून एकत्र रहाणार का ? असे विचारले असता, कोणतेही रुसवे फुगवे न ठवेता, युतीचे काम करून विधानसभा जिंकू असे विश्वास व्यक्त केला.
शिवसेनेच्या सचिवांवर आली नामुष्कीची वेळ !
या पत्रकार परिषदेत मुंबईहून आलेले शिवसेना सचिव संजय मिशिलकर यांना शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल झाले. असे असून देखील यांच्यावर पक्षाकडून कोणती कारवाई करणार असा प्रश्न केला. संजय मिशीलकर यांना या प्रश्नांवर कोणते उत्तर द्यायचे हे काहीकाळ सुचलेच नाही. शेवटी सारवासरव करत आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये. असे सांगून सवाल मिटवला. पत्रकारांच्या या प्रश्नांवरून शिवसेनेच्या सचिवांवर नामुष्कीची वेळ ओढवल्याचे दिसून आले.