भाजप सेनेच्या महायुतीमध्ये पडणार मिठाचा खडा ?  शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी घामासन सुरू

भाजप सेनेच्या महायुतीमध्ये पडणार मिठाचा खडा ? 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी घामासन सुरू…!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २२ ऑक्टोंबर – राज्याचे विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यांनतर जागा वाटपात महायुती तसेच महाआघाडी मध्ये बेबनाव सुरू झाला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपने शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकत राज्यातील देवेंद्र यांनी सोलापुरातील देवेंद्रसाठी आपले पालकत्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे सोलापुरातील अख्खी शिंदेसेना  गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहे. बघतोच मध्याची जागा कशी सुटते, या आक्रमक भूमिकेत साहेब,अण्णा, बापू, ताई, भाईजी दिसत आहेत.

दरम्यान भाजप पक्षाला शहर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघ सुटले असताना देखील भाजपने देवेंद्र कोठे यांना लॉन्च करण्यासाठी विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन मध्य विधानसभा मतदारसंघ शिंदेसेनेकडून काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. याला सोलापुरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांकडून कट्टर विरोध दर्शवला जात आहे. आपल्या हातून शहर मध्य मतदारसंघ निसटतो हे लक्षात आल्यानंतर शिंदे यांचे सर्व शिवसैनिक एकत्र आले आहेत. गेल्या चार दिवसापासून ते मुंबई मध्येच मुक्काम ठोकून आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाटाघाटीत आपल्या बाजूला निर्णय येईल. अशी आशा वाटत आहे. परंतु देवेंद्र फडणवीस ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

      कोणत्याही परिस्थितीत महायुतीला पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन करायचे आहे त्यामुळे कोणतीही रिस्क घेण्यास नेतेमंडळी तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशा अवस्थेत शहर मध्य मतदारसंघ पाहता येथे मुस्लिम आणि दलित मतदारसंख्या निर्णायक ठरणार आहे. मतांची गोळाबेरीज पाहिली असता, येथे मत विभाजन करून आपला उमेदवार कसा जिंकेल असा विचार विनिमय भाजप कडून केले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील शहर मध्य हा आमचा पारंपारिक मतदारसंघ असल्याने तो आमच्याकडेच राहील, अशी सिंहगर्जना केली जात आहे. यामध्ये शिंदेंच्या शिवसैनिकांना कितपत यश येईल हे सांगणे कठीण आहे.

   शहर मध्य च्या जागेसाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जोरदार घामासाहान सुरू झाल्याने महायुतीत मिठाचा खडा पडतो की काय असा प्रश्न आणि अवस्था निर्माण झाली आहेत. एका जागेसाठी एवढे ताणू नये की तुटेल, त्यामुळे समोपचाराने  हा प्रश्न मिटवावा. अशी मागणी आता स्थानिक शिवसैनिकांमधून केली जात आहे.

   एकंदरीत शहर मध्य मध्ये सुवर्णमध्य साधण्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नसल्याने नेमके शहर मध्य मध्ये काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *