सोलापूर शहर जिल्ह्यात करोडो रुपयांच्या विकासकामांचे झाले थाटात उद्घाटन…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. १५ ऑक्टोंबर – आगामी विधानसभा निवडणूक समीप आली असताना सोलापूर जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात विकास कामांना मंजुरी आणि भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर, मोहोळ, करमाळा, सोलापूर दक्षिण आदी मतदारसंघांमध्ये महायुती शासन खूपच गतिमान झाल्याचे दिसून येते.
अक्कलकोट शहर व तालुक्यात तेथील भाजपचे आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे १२०० कोटी रुपये खर्चाची विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच उरकण्यात आले. तर मोहोळ आणि करमाळा येथेही सुमारे ६७६ कोटी रुपयांच्या विकासकामांचा मुहूर्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साधण्यात आला. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून विकासकामांचे भूमिपूजन उरकले जात आहे. सांगोला आणि बार्शीतही युद्ध पातळीवर शेकडो कोटींची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.
शहर उत्तर मतदारसंघात प्रधानमंत्री आवास योजनेतून सोलापूर शहरातील असंघटित क्षेत्रातील तब्बल १२०० कामगारांना राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेतर्फे हक्काची घरे मिळण्यासाठीची सोडत प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. २०० सदनिकांसाठी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते संगणकीकृत पद्धतीने सोडत काढण्यात आली.
सोलापूर दक्षिणमध्ये भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध विकासकामे मंजूर करून आणली आहेत. याच मतदारसंघात भीमा सीना जोड कालवा प्रकल्पाला नुकतीच मंजुरी मिळाली असून त्यामुळे सीना नदीकाठच्या एकूण ५३ किलोमीटर लांबीच्या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उजनी धरणातून अर्धा टीएमसी पाणी मिळणार आहे. त्याचा लाभ प्रामुख्याने नंदूर, डोणगाव, तेलगाव, अकोले मंद्रूप, गुंजेगाव, पाथरी, वांगी,मनगोळी, वडकबाळ, हत्तूर, समशापूर, सिंदखेड, बिरनाळ, चंद्रहार, होनमुर्गी, बंदगी, औराद, राजूर, संजवाड, कोर्सेगाव, हत्तरसंग कुडल, बोळकवठा, कल्लकर्जाळ, कुमठे, केगाव आदी गावांना होणार आहे.
याशिवाय आमदार देशमुख यांच्या पाठपुराव्याने शहरातील होटगी रस्त्यावरील महिला हॉस्पिटल ते इंगळगीपर्यंत ३४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. त्यासाठी हायब्रीड इम्युनिटी मॉडेल प्रोग्राम (हॅम) अंतर्गत २२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याशिवाय विजापूर रस्त्यावरील हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिरांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत शासनाने ब वर्गाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे विविध पायाभूत विकासकामे आणि अन्य योजनांतून देवस्थान परिसराला चालना मिळणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.