सोलापुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ 

सोलापुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ !

शरद राष्ट्रवादी, उद्धवसेना,काँग्रेस,मनसे, माकप, वंचित यांचे हम साथ साथ है ! मात्र एम.आय.एम पक्षाला सोबत घेण्यास शिवसेनेचा विरोध कायम 

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच खरी लढत सोलापूरसह राज्यात लढणार आघाडीने लढणार – 

शिवसेना नेते माजी खा.चंद्रकांत खैरे 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.९ डिसेंबर 

आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी करूनच लढली जाईल, सोलापूर मधील पक्षांचे बलाबल पाहता इलेक्टिव्ह मेरिट प्राधान्य क्रमाने लक्षात घेतले जाईल. त्या आधारे महाविकास आघाडीचे स्थानिक नेते पुढील काही दिवसात जागावाटप करतील, भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच खरी लढत सोलापूर सह राज्यात त्वेषाने लढली जाईल. त्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र येत सर्वांची एक मोट बांधली आहे. सर्वजण मिळून भाजपला पाडणार आहोत. अशी स्पष्ट भूमिका महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी व पुढील रणनीती ठरवण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आलेले उद्धवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले, भाजपने केवळ पैशाच्या जीवावर निवडणुका लढवल्या. राज्यात लाडकी बहिण योजना आणली. केवळ पैशाचा वापर केला. प्रत्यक्षात राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला. नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीत पैशांचे बंडल सापडले. यावरूनच महायुतीत भांडण सुरू झाले आहेत. प्रत्येक निवडणुकीत पैशाचा चुराडा केला. ही महापालिका निवडणूक भाजपसाठी जड जाणार आहे. जागा वाटपावरून महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. सरकारकडून केवळ फसवेगिरी चालू आहे. राज्यात सत्ता मिळविली पण ठोस कामे करता आली नाहीत. स्थानिक पातळीवर देखील इलेक्टिव्ह मेरिट पाहता, जागावाटप केले जाईल. त्यासाठी महाविकास आघाडीचे स्थानिक नेते आग्रही आहेत. पुढील काही दिवसात स्थानिक नेते आणि पदाधिकारी याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, उमेदवाराची तसेच पक्षाची ताकद पाहून जागा लढवल्या जातील. असे देखील ते यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शिवसेना शहर प्रमुख अजय दासरी, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, महिला आघाडी प्रमुख आस्मिता गायकवाड, संतोष पाटील, दत्ता गणेशकर, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माकपचे नेते युसूफ शेख, अनिल वासम, मनसे नेते विनायक महेंद्रकर, जैनुद्दीन शेख, इंगळे आदींसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही अन्यथा आंदोलन 

संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र काही नेते वेगळा विदर्भ करण्यासंबंधी विचार करत आहेत. अशा परिस्थितीत भाषिक आणि प्रांतवाद सुरू केला जात आहे. त्याला आमचा तसेच महाविकास आघाडीचा तीव्र विरोध राहील. वेळ पडल्यास आम्ही उग्र आंदोलन करू परंतु त्या हुतात्म्यांची आहुती वाया जाऊ देणार नाही असे देखील ते विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

सत्ताधाऱ्यांचे ३५ आमदार फुटणार ?

सत्ताधारी महायुती पक्षातील आमदारांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. नगरपालिका निवडणुकानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, त्यापूर्वीच महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. काही आमदारांनी युतीतून बाहेर पडणार असल्याचे, मला सांगितले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ३५ आमदार फुटतील, असा आमचा अंदाज आहे. असे खैरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पुरुषोत्तम बरडे आणि अजय बासरी यांच्यातील वाद मिटला 

शिवसेनेचे शहरप्रमुख अजय दासरी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे यांच्यामधील वाद मिटला आहे. मी स्वतः त्यांची समजूत काढली आहे. ते पक्ष सोडून जाणार नाहीत. असेही चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

मुस्लिम मते ही काँग्रेसची एमआयएमची नव्हे !

एमआयएम पक्षाला महाविकास आघाडीत सोबत घेणार नाहीत का? अशा विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत खैरे यांनी सांगितले, महाविकास आघाडी प्रमुख तीन पक्षावर आधारित आहेत. त्यानंतर राज्यस्तरावर मनसे स्थानिक पातळीवर माकप आणि इतर काही पक्ष आमच्या सोबत आले आहेत. वास्तविक पाहता मुस्लिम मते ही पहिल्यापासूनच काँग्रेसचे आहेत. ती मते एमआयएमची नव्हती आणि नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रश्नच येत नाही. असेही त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *