आगामी निवडणुकीत युतीत राहणार समन्वय ; सोलापूर जिल्ह्यातील अनेक सरपंच, उपसरपंच नेतेमंडळी राष्ट्रवादीत होणार दाखल
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २२ जून
आम्ही महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी पक्षासोबत आहोत. परंतु आमची पुरोगामी विचारसरणी आजही कायम आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या तत्वावरून आणि विचारावरूनच आजही आमचा पक्ष चालत आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे. अण्णा बनसोडे विविध भेटीगाठी आणि कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, जरी आम्ही भाजपसोबत आहोत तरीही आम्ही आमची विचारसरणी सोडलेली नाही. या विचारावरच आमच्या पक्षाची स्थापना झालेली आहे. पुढे ते म्हणाले, आगामी निवडणुकांसाठी तीनही पक्षाचे प्रमुख नेते मंडळी एकत्रित येऊन चर्चा करतील त्यानंतर निवडणुकीला सामोरे जातील. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा, अशी मनातून इच्छा असते. तशी इच्छा मला आणि आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील अजित पवार यांच्या बद्दल कायम आहे. अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची प्रबळ इच्छा आहे.परंतु राज्यात जो पक्ष सर्वात जास्त जागा जिंकले, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे राजकीय गणित मानले जाते. त्यामुळे जर राज्याच्या जनतेची इच्छा असेल तर, अजित पवार हे नक्कीच मुख्यमंत्री होतील.
पुढे बोलताना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, इतर पक्षातील नेते मंडळी आमच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत या नेते मंडळींचे पक्षात प्रवेश करणार आहेत. काही नेत्यांनी स्वाक्षरी करून पक्षात प्रवेशसाठी संमती दर्शवली आहे. यापुढे जिल्ह्यातील अनेक सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य हे देखील आमच्यासोबत येतील. यासंदर्भात मी स्वतः स्थानिक पातळीवरील आमच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात दाखल होणाऱ्या नवीन नेत्यांच्या शंका दूर करणार आहे. त्यांना स्वतः अजित पवार यांनी पक्षात घेण्यासंबंधी आश्वासन दिले आहे. त्यामुळे या नेत्यांच्या शंका कुशंका दूर करून त्यांचा पक्षात प्रवेश केला जाणार आहे.
यावेळी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, प्रमोद भोसले, बसू कोळी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भाजप सोबत आलेली आहे. यापूर्वीच शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी देखील भाजपसोबत राज्य सरकार स्थापन केलेले आहे. तीनही पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेतेमंडळी एकत्रित येतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी युती संदर्भात चर्चा करतील. काही नेत्यांकडून आमच्या युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो सफल होणार नाही. तिन्ही नेते एकत्रित येऊन, भविष्यातील निवडणूक आणि मंत्रीपदाच्या नियुक्तीसाठी चर्चा करतील.
तिन्ही पक्षातील नेत्यांचे खटके… मात्र संघर्ष नाही
राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे वारंवार खटके उडतात. असा प्रश्न विचारल्यानंतर उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, काही गोष्टींवरून वाद झाल्यास खटके उडतायत. मात्र युतीत संघर्ष होत नाहीत. अशी घटना अद्याप घडलेली नाही. टोकाचा संघर्ष होत नाहीत.असे देखील बनसोडे यांनी सांगितले.
उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सदरचा वैयक्तिक दौरा
राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा दौरा हा वैयक्तिक दौरा होता. सरकारी किंवा पक्षाचा दौरा नव्हता. त्यामुळे संघटनात्मक किंवा सरकारी बैठका चर्चासत्रे झालेले नाहीत. वैयक्तिक पातळीवरील बैठका संपन्न झाल्या. उपाध्यक्ष बनसोडे यांच्या परिचयातील दक्षिण तालुक्यातील काही नेतेमंडळी त्यांच्या संपर्कात आहेत. तालुक्यातील काही २५ नेतेमंडळी त्यांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आले होते. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्व नेतेमंडळी पक्षप्रवेश करतील. अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर यासंबंधी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
– संतोष पवार, शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट