अज्ञातांनी एसटी बसेसच्या फोडल्या काचा ; सम्राट चौक आणि हायवेवरील डी मार्ट जवळ घटली घटना ….. परभणीचे उमटले पडसाद ?

अज्ञातांनी एसटी बसेसच्या फोडल्या काचा ; सम्राट चौक आणि हायवेवरील डी मार्ट जवळ घटली घटना 

पोलीस बंदोबस्तात बसेस मार्गस्थ ; अद्याप गुन्हा दाखल नाही

याच बसवर झाली दगडफेक

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१६ डिसेंबर

परभणी येथील घटनेचे पडसाद राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. संविधान विटंबना केल्याप्रकरणी परभणी येथे घडलेल्या घटनेवरून सोलापूर शहरात आज मोर्चा काढण्यात आला. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. दिवसभर शहरात या अनुषंगाने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र काही समाजकंटकांनी आणि अज्ञातांनी शेवटी संध्याकाळी एसटीला लक्ष केले. तीन एसटी बसेसच्या काचा फोडल्यामुळे, एस टी महामंडळाचे सुमारे ४० हजाराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दगडफेकीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सोलापूर एसटी स्टँड परिसरात पोलिसांचा बंदोबस्त 

                  दरम्यान, सोलापूरहुन साताराकडे जाणाऱ्या तसेच सोलापूरहून शिवाजीनगर पुणे आणि तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या या तिन्ही एसटी बसेसवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये एसटीच्या काचा फुटल्या. सोलापूर – सातारा या एसटी बसेसला सम्राट चौक येथे तर सोलापूर – पुणे आणि तुळजापूर – सोलापूर या बसला डी मार्ट येथे लक्ष करण्यात आले.

पोलीस बंदोबस्तात इतर बसेस सोडण्यात आल्या. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करून सदरच्या बसेस पोलीस बंदोबस्तात मार्गस्थ झालेल्या आहेत. त्यानंतर सोलापूर बस स्टॅन्ड वर आणि एसटी सोबत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेत.

उत्तम जुंदळे, आगार व्यवस्थापक सोलापूर आगार. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *