सोलापूरात लालपरीच्या अनेक फेऱ्या रद्द……!
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना सोसावा लागतोय मनस्ताप……..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. ४ सप्टेंबर – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याचा दर्जा द्या , कर्मचाऱ्यांना वेतन वाढ द्या , विविध योजेनेसाठी सरकारकडे निधी उपलब्ध आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढ करण्यासाठी निधी उपलब्ध नाही का ? असा सवाल उपस्थित करत दुसऱ्या दिवशी सुद्धा सोलापूर विभागीय कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबीत मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपात सोलापूर एसटी विभागातील अनेक चालक आणि वाहक यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. तर काहींनी कर्तव्यावर जाणे पसंत केले आहे. यामुळे तुरळक प्रमाणात एसटी बसेस सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू ठेवली आहे. मंगळवार ( दि. ३ ) सप्टेंबर पासून धरणे आंदोलन करत असंख्य कर्मचारी संपात सहभागी झाल्याने एसटी सेवेत खंड पडला आहे. अनेक बसेस रद्द करण्यात आल्याने प्रवाश्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बसेस उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. यावर महामंडळाने तोडगा काढावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
दरम्यान बुधवार ( दी. ४ ) सप्टेंबर रोजी देखील कर्मचाऱ्यांनी सोलापूर विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे. यावेळी ” आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा ” हमारी युनियन हमारी ताकत” हम सब एक है ” अशा विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
एसटी बसेस नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीदवाक्य घेऊन एसटी बसेस कार्यरत असतात. मात्र कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे अनेक मार्गावर एसटी बसेस धावत नसल्याने याचा प्रवाशांना त्रास होत आहे. आबालवृद्ध तसेच विद्यार्थी अशा विविध प्रवासी वर्गातून ओरड होत आहे. यावर महामंडळाने तसेच शासनाने निर्णय घ्यावा आणि प्रवाशांना सेवा उपलब्ध करावी.
– अमृत खांडेकर , प्रवासी
वरिष्ठ कार्यालयाकडून सूचने नुसार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत.
सोलापूर एसटी विभागातील नऊ आगारातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत. अकलूज आगार पूर्णतः बंद तर अक्कलकोट आगार अशंत: बंद इतर आगारात बससेवा तुरळक सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त होत आहेत. त्यानुसार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसस्थानक , आगार परिसर आणि विभागीय कार्यालय येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रश्नी लवकरच तोडगा निघेल. प्रवाश्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक मार्गावर किमान बसेस सोडण्याचे नियोजन केले जात आहे.
– अमोल गोंजारी , विभाग नियंत्रक सोलापूर एसटी विभाग.
कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबीत मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले.
सरकारने आमच्या मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. वेतन वाढ करण्याची मागणी ही आजची नाही , पाच वर्षांपासून यासाठी संघर्ष सुरू आहे. सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी हे आंदोलन पुन्हा एकदा सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी स्वतः हून हे आंदोलन हातात घेतले आहे.
– प्रशांत गायकवाड , वाहतूक नियंत्रक सोलापूर एसटी आगार.
सरकारने वेतन वाढ निधी तरतूद केली नाही.
सरकारने विविध प्रकारच्या योजना लागू करून सर्वांना निधी मंजूर केला. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांकडे दुर्लक्ष करीत , वेतन वाढीसाठी कोणतीही तरतूद केली नाही. वास्तविक पाहता आमच्या मागण्या ह्या रास्त आणि योग्य आहेत. सरकारने यामध्ये तात्काळ निर्णय घ्यावा.
– बलभीम पारखे , लिपिक सोलापूर एसटी आगार.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना गोड बातमी द्यावी.
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. याकाळात सरकारने जनतेला आणि एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये. लागलीच यावर ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा. एसटी आमची माय – बाप आहे, त्याचे नुकसान करून आम्हाला बरे वाटणार नाही, अशी विनंती आम्ही करत आहोत.
प्रसाद कुंभारे, वाहक सोलापूर एसटी आगार.
यावेळी बाळासाहेब मोरे , श्रीकांत सड्डू , ज्ञानेश्वर लामकाने, केतन कोळी, प्रभाकर शेरखाने, गोविंद गोळवे, संजय शिंदे सागर शिंदे, सदाशिव अंबुरे, सुनील सिंदकर, विनोद सिंदकर, बाळासाहेब सोनटक्के, हर्षद आटले, विशाल भंडारे, संतोष जोशी, सुनिल गायकवाड, अजून सह कृती समितीचे पदाधिकारी सदस्य आणि एसटी कर्मचारी उपस्थित होते.