एसटी बसस्थानकाच्या आऊट रोडची दुर्दशा ; मोठमोठ्या खड्ड्यातून काढावा लागतो एसटीला मार्ग..
एसटी महामंडळासह प्रशासनाचे दुर्लक्ष….!
सोलापूर व्हिजन
सोलापूर दिना २५ जुलै – सोलापूर एसटी बसस्थानकातून सम्राट चौकातील आऊट गेटकडे बाहेर पडणाऱ्या एसटी बसेसना मोठमोठ्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये ही समस्या डोके वर काढत आहे. खड्ड्यातून एसटी बस जाताना अक्षरशः बस एका बाजूला झुकत असल्याने अप्रिय घटनेला नसते आमंत्रण मिळत आहे.
सोलापूर एसटी बस स्थानकामध्ये इतर आगारातील तसेच सोलापूर विभागातील अनेक एसटी बसेस याच रस्त्यावरून ये जा करत आहेत. सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यातून एसटी बस जाताना एसटी दोन्ही बाजूने हेलकावे खात आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. एखादी एसटी बस खड्ड्यातून मार्ग काढताना जर अप्रिय घटना घडेल तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान याकडे एसटी महामंडळ आणि महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्यात ही समस्या निर्माण झाली आहे. याकडे महामंडळासह महापालिकेने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन एसटी धावते आहे. परंतु हीच धावणारी एसटी खड्ड्यांच्या समस्येत अडकून गेली आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे एसटी चालकाला खड्ड्याचा अंदाज न येता अप्रिय घटना सांगून येणार नाही अशी अवस्था बनलेली आहे.
एसटी बसमधून इतरत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र सोलापूर बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक एसटी बसमधील प्रवाशांना या मोठ मोठ्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
सोलापूर एसटी बस वाहन तळावर साचले तळे
गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहरात संततदार जलधारा बरसत आहे. यामुळे शहरातील विविध सखलभागात पाणी साचले आहे. सोलापूर एसटी बस स्थानक त्याला अपवाद नाही. या ठिकाणी देखील पडलेल्या पावसाचे पाणी एखाद्या तळ्याप्रमाणे साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. वाहनतळावर नेहमीच हे विदारक चित्र दिसते.