एसटी संगे धुराळा अन फुफाटा…..!
श्वसनाच्या आजारांना मिळते फुकटचे आमंत्रण…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. १६ सप्टेंबर – सध्या शहरात श्वसन प्रक्रियेचे मोठे आजार उद्भवत आहेत. यासाठी धूळ आणि धूर कारणीभूत ठरत आहेत. शहरातून मोठी वाहने ये – जा करताना त्यांच्या मागे नेहमीच मोठ्या स्वरूपात धुराळा उडतो. हाच धुराळा हवेने उडून वाहनधारकांच्या श्वसन प्रक्रियेवर आघात करतो आहे. त्याची झलक सोलापूर बसस्थानकावर दिसून आली. एसटी बसेस शहरात धावू लागल्या, तर सोबत धुराळा अन फुफुटा घेऊन जातात. त्यामुळे एसटी प्रवाशांसह धुराळा आणि फुफाटा घेऊन जाते का असा प्रश्न ? नागरिकांना सतावत आहे. त्या घटनेचा प्रत्यय रविवार ( दि. १५ ) सप्टेंबर रोजी दिसून आला. एसटी महामंडळाच्या बसेस जेव्हा सोलापूर बसस्थानकातून बाहेर निघाल्या तेव्हा, सम्राट चौकाकडे जाताना आपल्या सोबत भला मोठा धुराळा आणि फुफाटा वाहून नेत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे एसटी बसेसच्या पाठीमागे असणाऱ्या वाहनधारकांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. वाढता धूरुळा आणि काळा धूर यामुळे श्वसन प्रक्रिया बिघडत चाललेली आहे.
सोलापूर एसटी बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसेस याच मार्गावरून जात असतात. वारंवार या मार्गावरून एसटी बसेस जात असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यानंतर येथे भले मोठे तळे साचते. हाच खड्डा बुजवण्यासाठी मुरूम आणि माती टाकण्यात आली.
मात्र पावसाने ओढ दिल्यानंतर याच मुरूम आणि मातीचे रूपांतर धूळ आणि फुपाट्यात होत आहे. एसटी बस गेली की हवेने पाठीमागे धुराचे आणि धुळीचे वलय निर्माण होत आहे. धुळीच्या याच वलयामुळे गंभीर स्वरूपाचे श्वसन आजार निर्माण होत आहेत. चिमुकल्या बालगोपाळांना तर धुळीचे एलर्जी असल्याने त्यांची अवस्था नाजूक बनत आहे. त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध महिलांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाढत्या धुळीमुळे आरोग्य आले धोक्यात.
धूळ आणि धूर यांचा मारा वाहनधारकांच्या चेहऱ्यावर होत आहे. त्यामुळे अनेक जण मास्क तसेच महिला स्कार्फचा आधार घेत आहेत. तरीदेखील धुळीचे प्रमाण मोठ्या स्वरूपात असल्याने, नागरिकांना खोकला दमा या श्वसन रोगाचे प्रादुर्भाव होत आहे. याकडे संबंधित महामंडळ प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
– सतीश शिंदे , वाहनधारक.
महापालिका प्रशासन आणि एसटी महामंडळाने यावर तोडगा काढावा.
संबंधित समस्येवर एसटी महामंडळ आणि महापालिका प्रशासनाने बैठक घेऊन तोडगा काढावा. रस्त्याची वारंवार होणारी दुरावस्था तसेच सर्वत्र पसरणारा धुराळा व फुफाटा यावर उपाययोजना करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा.
– बंडू गायकवाड , स्थानिक नागरिक.