राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने दिला इशारा…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २० जुलै – हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह पालघर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.