शिवशाही बस जळून खाक ! मध्यरात्री साडेबाराची घटना !
परभणीचे पडसाद की ? दारुड्यांचा प्रताप ; पोलिसांची शोध मोहीम सुरू
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१७ डिसेंबर
सोलापूर आगारातील बस यार्ड मध्ये देखभाल दुरुस्ती करून उभ्या करण्यात आलेल्या आरामदायी शिवशाही बसला मध्यरात्री अचानक आग लागली. साडेबारा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बस क्र.एम.एच. ०६. बी. डब्लू. ०५८९ शिवशाही बस जळून खाक झाली. या आगीमध्ये एसटी महामंडळाचे सुमारे १८ लाखांचे नुकसान झाले आहे. शिवशाही बस मधील एअर कंडिशन सिस्टीम तसेच इतर तंत्रज्ञान जळून खाक झाल्याने एसटी महामंडळाला लाखोंचा भृदंड सोसावा लागणार आहे. तसेच शिवशाहीच्या बाजूला उभी असलेली एम.एच.११ बी.एल. ९०६७ या क्रमांकाच्या सोलापूर – मंगळवेढा या साध्या लालबसला देखील आगीची धग लागली. यामुळे एसटीचे समोरील काच आणि आरसा तडकला आहे. यामध्ये साध्या बसचे देखील सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सोमवारी संध्याकाळी दोन एसटी बसेसच्या काचा आज्ञातांनी फोडल्या होत्या. संध्याकाळी ही घटना ताजी असतानाच मध्यरात्री पुन्हा एसटी बसेसला अचानक आग लागल्याने, सदरची घटना संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. रात्री साडेबारा वाजता दारुड्यांची टोळी येथे होती. अशी माहिती एसटी महामंडळाच्या सुरक्षा रक्षकाने दिली आहे. त्यानुसार पोलीस सीसीटीव्ही कॅमेरामध्ये याची तपासणी करत आहेत. दारुड्यांमुळे सदरच्या बसला आग लागली का? का परभणीचे पडसाद उमटले ? हा प्रश्न आता पोलीसांसमोर उभा आहे.
मंगळवारी सकाळी सोलापूर आगार व्यवस्थापक उत्तम जुंदळे, अधिकारी कर्मचारी यांनी शिवशाही बसेसची संपूर्ण तपासणी केली आहे. यामध्ये एसी सिस्टीम जळून खाक झाली असून, पडदे, कुशन आणि इंजिन देखील जळाल्याचे सांगण्यात आले. रात्रीच ही शिवशाहीबस देखभाल दुरुस्ती करून यार्डमध्ये उभी करण्यात आली होती. आज सकाळी पुणे मार्गावर सदरची बस सोडण्यात येणार होती. अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

परभणीचे पडसाद की ? दारुड्यांचा प्रताप ; पोलिसांची शोध मोहीम सुरू
राज्यात परभणीचे पडसाद उमटत आहेत. सोमवारी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी एसटी बसेसच्या काचा फोडल्या. मध्यरात्री १२.३० वाजता बसला आग लागली का ? लावण्यात आली? हा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. एसटी महामंडळाचे सुरक्षा रक्षकाने रात्री दारुड्यांचा वावर होता, असे सांगितल्यामुळे सदरची घटना ही परभणीचे पडसाद की ? दारुड्यांचा प्रताप असा प्रश्न आता पोलिसांसमोर आला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांची शोध मोहीम सुरू झाली आहे.
सदरच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
शिवशाही बसला रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. बसचे सुमारे १८ लाखांचे नुकसान झाले आहे. आग लागली का ? लावली आहे. या घटनेचा पोलिसांचा तपास सुरू आहे. या अगोदर बसेसच्या काचा फोडल्या त्याचा देखील पंचनामा सुरू आहे.
– उत्तम जुंदळे, आगार व्यवस्थापक सोलापूर आगार.
सदरच्या घटनेबाबत महामंडळाकडून फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू आहे.
सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस घडलेल्या घटनांवरून एसटी महामंडळाकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून फिर्याद नोंदवण्याचे कामकाज सुरू आहे. पोलीस ठाण्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली असून फिर्याद दिल्यानंतर गुन्हा नोंदवला जात आहे.
– अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक एस टी महामंडळ सोलापूर.