सोलापुरात मराठी कानडी वाद पेटला !
ठाकरेंच्या सेनेने कर्नाटक बसेसवर स्प्रे पेंटिंगने लिहले जय महाराष्ट्र ! तर शिंदेंच्या सेनेने एसटी स्टँडमधील कर्नाटकच्या चालक वाहकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने केले आंदोलन….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२५ फेब्रुवारी
मराठी कानडी वाद विकोपाला गेला आहे. चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी बसेसला काळे फासले आहे. तसेच चालक वाहकांना मारहाण करून त्यांच्या चेहऱ्यावर देखील काळे फासल्यांनतर हा वाद वाढत चाललेला आहे. कोल्हापुरात त्यानंतर पुणे आणि आता सोलापुरात याचे पडसाद उमटत आहेत. सोलापूर शहरातील ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेने या घटनेचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलने केली. गांधीगिरी पद्धतीने कर्नाटकच्या चालक वाहकांचा सत्कार केला. त्यांच्यावर गुलाल उधळला गुलापुष्प दिले. महाराष्ट्रात यायचं असेल तर जय महाराष्ट्र बोलण्याचा इशाराही दिला. याप्रसंगी उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी आक्रमक रूप घेत सात रस्ता येथील कर्नाटक बसवर भगव्या स्प्रे प्रिंटिंगद्वारे जय महाराष्ट्र लिहिले. कर्नाटक राज्याचा निषेध नोंदवला. यावेळी ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी कर्नाटक एसटीच्या चालकाला जय महाराष्ट्र बोलण्याचा सज्जड दम भरला.
दरम्यान, दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर सोलापूर बसस्थानकात शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. कर्नाटक राज्याच्या एसटी बसेसच्या चालक वाहकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करत या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी कर्नाटकात यापुढे, अशा घटना घडल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आम्हीही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून कर्नाटक सरकारला नुकसान पोहोचवू शकतो.
कर्नाटक येथील कानडी वेदिका संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या एसटी बसेसला काळे फासले चालक वाहकांना मारहाण करून त्यांच्या चेहऱ्याला देखील काळेफासले. हे अत्यंत चुकीचे आहे. आम्हालाही वेगळ्या पद्धतीने कर्नाटक सरकारला नुकसान पोहोचवता येऊ शकते. परंतु आम्ही तसे करणार नाही. यापुढे जर अशा घटना घडत राहिल्या, तर मग नक्कीच वेगळे पाऊल उचलून यापुढे आणखीन तीव्र आंदोलन करू आणि कर्नाटक सरकारला त्याचे नुकसान सहन करावे लागेल. त्याची जबाबदारी सर्वस्वी कर्नाटकची राहील.
– अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख शिवसेना शिंदे गट.
महाराष्ट्रात यायचं असेल तर जय महाराष्ट्र बोलावे लागेल.
महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या बसेसवर आम्ही जय महाराष्ट्र लिहिले आहे. यापुढे कर्नाटकच्या बसेसला महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल तर त्यांच्या चालक वाहकांना जय महाराष्ट्र बोलावे लागेल. त्यांची मुजोरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही.
अतुल भंवर, शिवसैनिक ठाकरे गट.