शहर मध्य मधून मनीष काळजेसह मनसे, संगा, भंडारे, करगुळे, गायकवाड यांची माघार ” कोठेंना मिळणार दिलासा ?
तर शेवटच्या क्षणी तौफिक शेख निवडणुकीच्या रिंगणात ; फारूक शाब्दींचे वाढणार टेन्शन
काँग्रेसने पठाण, भंडारे, करगुळे यांची काढली समजूत ? चेतन नरोटे यांचा आशावाद कायम ; मोची समाज ठरणार किंग मेकर !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.४ नोव्हेंबर – विधानसभा निवडणुकीचा नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून एकूण १९ जणांनी आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात आज ३९ पैकी १९ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यानंतर आता भाजपचे देवेंद्र कोठे, काँग्रेसचे चेतन नरोटे, माकापाचे नरसय्या आडम, एम.आय. एम. फारूक शाब्दी आणि अपक्ष तौफिक शेख यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. तर इतर अपक्ष देखील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

दरम्यान शेवटच्या क्षणी शहर मध्य विधानसभा निवडणूक कार्यात आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आलेले तौफिक शेख मात्र निवडणुकीचे रिंगणात असणार आहेत. नाट्यमय घडामोडी नंतर त्यांचा अर्ज कायम असणार आहे. आज दुपारी ३.२ मिनिटांनी शेख हे आपल्या कार्यकर्त्यांसह दूचाकीवर कार्यालयात दाखल झाले. मात्र तोपर्यंत कार्यालय बंद करण्यात आले होते. प्रशासनाने काही काळासाठी त्यांना थांबवून घेतले, परंतु अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवार कार्यालयात विहित वेळेत न आल्याने शेख यांचा अर्ज कायम ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी शेख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी कार्यालयात दाखल होतो, परंतु प्रशासनाने त्याची नोंद घेतली नाही असे सांगितले.


दरम्यान शिवसेनेला डावलण्यात आल्याने नाराज झालेले जिल्हाप्रमुख मनीष काळजे स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अखेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व उमेदवारांना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची मनधरणी करण्यात यश आले असून, काळजे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आणि भाजपच्या आश्वासनानंतर भगव्यासाठी मी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. शहर मध्य भगवामय करणार, या भगव्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपशी कोणतीही वाटाघाटी झाली नाही. परंतु शिवसैनिकांचे मानसन्मान ठेवला पाहिजे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे मनसेकडून इच्छुक असणारे नागेश पासकंठी यांनीदेखील पक्षाचा आदेश सर्वोच्च मानून आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले.

एकंदर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मनीष काळजे, श्रीनिवास संगा, अंबादास गोरंटला, यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. यावेळी देवेंद्र कोठे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना मनीष काळजे हे आमचे बंधू आहेत. युतीधर्मा पाळून त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत ते आमच्यासोबत, आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे येऊन एका बंधू प्रमाणे काम करतील, या निवडणुकीत त्यांना व सर्व शिवसैनिकांना संपूर्ण मानसन्मानाने वागणूक दिली जाईल मानसन्मान दिला जाईल. आम्ही सगळे भगव्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत, आणि शहर मध्य भगवामय करू असे सांगितले.
यावेळी शहर मध्य निवडणूक कार्यालय परिसरात निवडणूक लढवणारे उमेदवार, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. निवडणूक कार्यालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तौफिक शेख यांच्या उमेदवारीने शाब्दी यांची वाढणार डोकेदुखी
विधानसभा निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांनी शेवटच्या क्षणाला अर्ज मागे घेण्यासाठी कार्यालयात दाखल झाले. परंतु प्रशासनाने त्यावर आक्षेप घेतल्याने त्यांचा अर्ज कायम ठेवला आहे. शेख यांच्या उमेदवारीमुळे एम.आय.एम पक्षाचे उमेदवार फारूक शाब्दी यांचे टेन्शन वाढणार आहे. मुस्लिम बहुमूलक भागात शेख आणि शाब्दी यांच्यात टक्कर असणार आहे. त्यामुळे मुस्लिम मतदानाचे विभाजन ही डोकेदुखी एम.आय.एम पक्षाचे उमेदवार फारूक शाब्दी यांच्यासमोर असणार आहे.
यांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे..
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल केलेले मनीष काळजे, नागेश पासकंटी, श्रीदेवी फुलारे, देवेंद्र भंडारे, अंबादास गोरंटला, श्रीनिवास संगा, प्रमोद गायकवाड, शिवराज गायकवाड, संतोष येमुल, अंबादास करगुळे, रघुनाथ कंदीकटला, शौकत पठाण, मुस्तफा शाब्दि, सादिक नदाफ, सादिक शेख, युसूफ खान पठाण, गौस कुरेशी, अबूहुरेरा सय्यद, अशोक बोकीवाले, यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शहर मध्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण २० उमेदवार असणार आसून, येथे कोठे, शाब्दी, आडम, आणि शेख यांच्यातच चौरंगी लढत होणार आसल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रेसने पठाण, भंडारे, करगुळे यांची काढली समजूत ? चेतन नरोटे यांचा आशावाद कायम
काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस पक्षांतर्गत नाराजी नाट्य सुरू झाले होते. शौकत पठाण तसेच मोजी समाजाचे देवेंद्र भंडारे, आणि अंबादास करगुळे यांनी देखील उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने चेतन नरोटे यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर मुस्लिम समाज आणि मोची समाज काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पठाण, भंडारे आणि करगुळे यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. मात्र काँग्रेस यांची समजूत काढण्यात यशस्वी झाली आहे का ? हा प्रश्न अद्याप कायम आहे. दरम्यान चेतन नरोटे यांनी याबाबत बोलताना म्हणाले की, नाराजी संपलेली आहे. मोची समाज काँग्रेस पक्षासोबत राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
मोची समाज ठरणार किंगमेकर !
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघात मोची समाजाची लोकसंख्या ही लाखांच्या घरात आहे. तर एकूण मतदार संख्या सुमारे ६० हजार इतकी आहे. या तेलुगू भाषिक समाजाच्या मतांवर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे गणित असणार आहे. एकीकडे काँग्रेस पार्टीपासून मोची समाजाचे नेते दुखावलेले आहेत. त्याचा फायदा भाजप घेणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप पक्षात देखील तेलुगू भाषिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यरत आहेत. जर या विधानसभा निवडणुकीत मोची समाजाचे मतदान फिरले? तर ज्या उमेदवाराच्या पारड्यात ही मते जातील, तो उमेदवार जिंकून येईल असे बोलले जात आहे. त्यामुळेच मोची समाज विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात किंगमेकर ठरणार आहे. जरी मोची समाजाचे नेते उघडपणे काँग्रेस पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत नसले तरी, आमचा समाज हा किंगमेकर ठरेल! असा आशावाद व्यक्त केला जात आहे.