राज्यात एम फॅक्टर तर सोलापुरात एस फॅक्टर चा परिणाम !
राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २० ऑक्टोंबर – आगामी विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून सर्वपक्षीय नेते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा विनिमय करण्यात व्यस्त आहेत. सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांवर बैठका घेण्याचे सिलसिले सुरू केले आहेत. तर काहींनी आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी मुंबई गाठलेली आहे. शहर मध्य विधानसभा मतदार संघावरून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. दलित आणि मुस्लिम मतदारांच्या जीवावर महाविकास आघाडी शहर मध्य आपणच काबीज करणार आहोत. असा ठोस दावा करत आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेचे शिवसैनिक देखील गेल्या काही वर्षांपासून शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामांच्या जोरावर आपणच या मतदारसंघातून विजयी होऊ असे विश्वास व्यक्त केला आहे.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी अनेकांनी कंबर कसली असून सर्वाधिक रस्सीखेच काँग्रेस पक्षामध्ये दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाला डावलले जात आहे या कारणावरून शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आदींनी कोणालाही उमेदवारी द्या परंतु काँग्रेस समाज बांधवाला न्याय द्या. अभी नही तो कभी नही अशी जोरदार घोषणा देत काँग्रेसला पर्यायाने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना घोडखिंडीत गाठायचा प्रयत्न केला आहे. मात्र यावर काँग्रेस काय भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात एम फॅक्टर तर सोलापुरात एस फॅक्टर चा परिणाम
राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथा पालथ सुरू आहे. मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला पर्यायाने भाजपला टक्कर देण्यासाठी नवीन योजना आखली आहे. त्यानुसार राज्यात मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. तर दुसरीकडे सोलापूर शहरात देखील एस फॅक्टर जोरात सुरू आहे. “बस नाम ही काफी है “! असं म्हणत एस फॅक्टरचा परिणाम मुस्लिम बहुमूलक इलाक्यात जाणवणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कोणती रणनिती आखली आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात मनोज जरांगे आणि शहरात फारूक शाब्दि यांची वरचेवर वाढत चाललेली क्रेझ रोखण्यात सत्ताधारी तसेच विरोधकांना यश येईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.