पारावर कट्ट्यावर निवडणूकीची चाय पे चर्चा ;  विधानसभा कोण जिंकणार ? सोलापूर शहरात आले चर्चेला उधाण 

वाजताहेत विधानसभा निवडणूकीचे पडघम पारावर कट्ट्यावर निवडणूकीची चाय पे चर्चा ;

 विधानसभा कोण जिंकणार ? सोलापूर शहरात आले चर्चेला उधाण ….!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २२ ऑक्टोंबर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची रूपरेषा निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर सोलापूर शहरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. शहरातील चौका चौकात निवडणुकीचे पडघम वाजायला आत्तापासूनच सुरुवात झाली आहे. शहरातील पारावर व कट्ट्यावर निवडणूकीची चर्चा सुरू झाली आहे. विनासधभेची ही निवडणूक कोण जिंकणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    गत विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर महाविकास आघाडीचा उदय झाला. शिवसेनेने भाजपशी फारकात घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी बस्तान बांधून आपली वेगळी सत्ता निर्माण केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अडीच वर्ष हे सरकार चालले ना तोच राजकीय भूकंप घडला आणि एका रात्रीतनं शिवसेना फोडली गेली. शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या मर्जीतल्या आमदारांसह सरकार पाडून नवीन सरकार स्थापन केले. आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस  झाले. या भूकंपातून सावरताना सावरतोच पुन्हा एक भूकंप घडला आणि राष्ट्रवादीमध्ये दुफळी निर्माण करत, अजित दादांना बाजूला करून त्यांना देखील सत्तेमध्ये सहभागी घेत उपमुख्यमंत्री केले.

   दरम्यान राज्याच्या राजकारणात एवढा मोठा भूकंप एका वर्षात किंवा एका टर्ममध्ये कधी झाला नव्हता तो रेकॉर्ड ब्रेक यंदा झाला. त्यामुळे जनतेवर याचा मोठा परिणाम पडला आहे. राजकारणाने अतिशय खालचा स्तर गाठला असून  अशा पद्धतीने राजकारण कधी स्वप्नात होईल असे कोणाला वाटले नव्हते. त्यानंतर महायुती सरकारने सत्ता स्थापन करून उरलेले अडीच वर्षे वाटून घेतली. आता निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आल्यानंतर, विविध आकर्षक योजनेच्या माध्यमातून जनतेला महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू झाला आहे. लाडकी बहीण योजना, बेरोजगारांसाठी कौशल्य योजना, शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा पद्धतीने योजना सुरू करून जनतेला आकर्षित केले आहे. या योजनेचा फायदा सरकारला कितपत होतो. हे येणारा काळच ठरवणार आहे.

चौका चौकात चाय पे चर्चा….

होऊ घातलेली विधानसभा निवडणूक अतिशय रंगतदार बनली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकदा महायुती सरकार येईल का? महाविकास आघाडी मुसंडी मारेल ? अशा चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. शहरातील विविध चहा टपऱ्यांवर तसेच कट्ट्यांवर नागरिकांमध्ये मतदारांमध्ये तसेच युवकांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीबाबत मत मतांतर ऐकण्यास मिळत आहे. महाविकास आघाडी पुन्हा मुसंडी मारायला, असे बरेच मतदारांचे म्हणणे आहे. तर महिला वर्गामध्ये महायुती सरकारला एक जिव्हाळ्याचा कोपरा मिळत आहे. योजनांच्या माध्यमातून सरकार कितपत मतदारांच्या मनामध्ये पोहोचले आहे. हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे. 

महिलांची मते ठरणार निर्णायक  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना आर्थिक लाभ देत आहे. राज्यात तसेच सोलापूर शहर जिल्ह्यात या योजनेचा कितपत प्रभाव पडणार आहे. हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिलांची मते जाणून घेऊन सरकारने योजना सुरू केली आहे का? महिलांच्या मतावरच सरकार येणार आहे का? असे प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहेत. असे असले, तरीही महिलांची मते ही येणाऱ्या काळात निर्णायक ठरणार आहेत एवढे मात्र नक्की !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *