विधानसभेनंतर सोलापूर बाजार समितीचा महामुकाबला !
स्थगितीनंतर जानेवारीत होणार निवडणुकीची धामधूम….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२५ नोव्हेंबर –
महाराष्ट्र राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या श्री सिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला नव्या वर्षात सुरुवात होईल. राज्य सरकारने ३१ डिसेंबर पर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे इतर सर्व निवडणुकांना स्थगिती देण्यात आले होती. परंतु आता विधानसभेची धामधूम संपली आहे. त्यामुळे जानेवारी २०२५ पासून बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. या निवडणुकीत देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा महामुकाबला दिसून येईल.
दरम्यान राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने ७ ऑक्टोबर पासून सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती दहा नोव्हेंबरला मतदान होणार होते परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या निवडणुकीला स्थगिती दिली ७ ते ११ ऑक्टोबर पर्यंत याकालावधीत नामनिर्देशनाची प्रक्रिया होती सात ऑक्टोबर रोजी तब्बल दोनशे जणांनी उमेदवारी अर्ज घेतले होते. निवडणूक कार्यक्रम स्थगित करताना ज्या टप्प्यावर प्रक्रिया थांबली, तिथून पुढे प्रक्रिया सुरू होणार आहे. असे यावेळी सांगण्यात आले.
१७ जागांसाठी मतदान
बाजार समितीचे एक जानेवारी रोजी निवडणुकीची स्थगिती उठणार आहे. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रियेला सुरुवात होईल. फेब्रुवारी महिन्यात १७ जागांसाठी मतदान असल्याची माहिती राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली.
माने आणि हसापुरे यांचा लागणार कस
दक्षिण व उत्तर सोलापूर या दोन तालुक्यातील बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे सुमारे पाच हजार मतदार आहेत. दोन्ही तालुक्यातील सोसायट्यांवर माजी आमदार दिलीप माने व सुरेश आशापुरे यांचे वर्चस्व असून, राज्यात महायुतीचे सरकार आल्याने बाजार समितीत सत्ता कायम ठेवण्यासाठी या दोघांवर निवडणुकीचा कस लागणार आहे.