मंगलमूर्ती गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी श्रीसाई आर्ट्सचे मूर्तिकार व्यस्त..
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २३ जुलै – गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत मूर्तिकार बाप्पाच्या सुरेख मूर्ती घडविण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. नीलम नगर परिसरात असणाऱ्या श्री साई आर्ट्स मधील गणेश मूर्तींची रवानगी बॅकॉक अन लंडनला करण्यात आली आहे. घरगुती आकारातील दोन फुटांच्या आकर्षक अशा सुमारे चारशे श्रींची सुरेख मूर्ती कंटेनरच्या माध्यमातून जहाजंमार्गे एक गणेश उत्सवाच्या महिन्या अगोदरच पाठविण्यात आले आहेत.
श्री साई आर्ट्स मधील गणेश मूर्तींची सुबकता परदेशातील गणेश भक्तांना देखील आकर्षित करत आहेत. मागील वर्षी देखील श्री साई आर्ट्स मधील गणेश मूर्तींची मोठ्या प्रमाणात परदेशात मागणी होती. यंदा देखील बाप्पा लंडन आणि बॅकॉकला रवाना झाले आहेत. उच्च दर्जाच्या पॅकिंगच्या माध्यमातून सदरच्या मूर्ती एक महिना अगोदरच पाठवून दिल्या आहेत.
दरम्यान यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात श्री रामलल्ला , संत तुकाराम महाराज, गजमुख , बालगणेश , अशा विविध रूपातील गणपती बाप्पा साकारण्यात मूर्तिकार मधुकर कोक्कुल , बालाजी श्रीराम , अंबादास दोरणाल आणि त्यांचे इतर सहकारी व्यग्र आहेत. यंदा आयोधीतील श्रीरामलल्ला ,
देहूचे संत तुकाराम महाराज यांच्या रूपातील आणि वेशभूषेतील श्रींची मूर्ती आकर्षक भासत आहे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यानंतर दक्षिण भारतात आणि आता भारतासह इतर देशात देखील सुरेख गणपती बाप्पाची मागणी वाढत चाललेली आहे. मागणीच्या तुलनेत गणेश मूर्ती बनवण्यात बराच कालावधी लागत आहेत.
वर्षभर गणेश मूर्ती साकारण्याचे काम चालू राहते. मात्र गणेशोत्सवाच्या दोन महिने अगोदर बाप्पांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याने रात्रंदिवस मूर्ती घडवण्यात आणि रंगवण्यातच मूर्तिकार व्यस्त असतात. गेल्या अनेक वर्षांपासून श्री साई आर्ट्स मधील सुरेख गणपती बाप्पा गणेश भक्तांसाठी एक वेगळीच पर्वणी उपलब्ध करून देत आहेत. आकर्षक रंगसंगतीमधील वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण गणपती बाप्पाचे मूर्ती भक्तांसाठी हवेहवेसे वाटतात.
परदेशात श्रींच्या मूर्तींची वाढली क्रेझ
सोलापूरच्या गणेश मूर्तींची मागणी पूर्वी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात होती परंतु आता देशासह परदेशात देखील बाप्पाची मागणी वाढली आहे. यंदा लंडन बॅकॉकला इतर देशात गणेशमूर्ती पाठवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पारंपारिक पद्धतीच्या गणेश मूर्तींची क्रेझ इतर देशात आणि दक्षिण भारतात वाढत चाललेली आहे.
– मधुकर कोक्कुल , मूर्तिकार श्री साई आर्ट्स नीलम नगर
कच्चा माल आणि जी.एस. टी मुळे गणपतींच्या दरात वाढ
गणेशोत्सव साजरा करताना गणेशभक्तांना नेहमी मूर्तींच्या वाढत्या दरवाढीचा सामना करावा लागतो. यंदा देखील गणपती बाप्पाच्या मूर्ती या महागल्या आहेत. गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारा पी.ओ.पी , आकर्षक रंग , तसेच जी.एस.टी , कर्मचाऱ्यांचा पगार , टॅक्स आणि लाईट बिल अशा विविध कारणामुळे गणेश मूर्तींच्या दरात दहा टक्के वाढ झालेली आहे.