लोकमंगलचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी संपन्न होणार
३७ जोडपी होणार विवाहबद्ध – आ.सुभाष देशमुख यांची माहिती
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१४ डिसेंबर
दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवार दि.१५ डिसेंबर २९२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोरस मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. हा फौंडशनतर्फे होणारा ४३ वा सामुदायिक विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यात ३७ जोडपे विवाहबद्ध होणार आहेत, अशी माहिती लोकमंगल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल मल्टीस्टेट, आदी एकूण १२५ पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यात शहर आणि जिल्हातील ३७ जोडप्यांनी नोंदणी केली आहॆ. सर्व विवाह हिंदू पद्धतीने होणार आहे. या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वर्हााडी मंडळीच्या भोजनाची सोय, मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहेत. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. वधू- वरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूकही काढण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत. या विवाह समारंभात सर्व वधू-वरांकडील हजारो वर्हाेडींना भोजनाची सोय करण्यात आली आहे. समारंभासाठी शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर २५० बाय २०० फूट आकाराचा मुख्य अक्षता मंडप उभारण्यात येणार आहे. जेवणाची व्यवस्था ९० बाय १५० फूट आकाराच्या मंडपात करण्यात आली आहे. याशिवाय दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले आहे. याचवेळी नवविवाहित जोडप्यांना संसार सुखाचा करण्याबाबत सूचना देणारा समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित आला आहे,असे आमदार देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शशी थोरात, सोमनाथ केंगनाळकर , मारुती तोडकर, हरिभाऊ चौगुले, माणिक नरोटे, अभय पटणे आदी उपस्थिती होते.
सोहळ्यामध्ये जपणार सामाजिक भान
उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या आरोग्यासाठी तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल. ऐच्छिक रक्तदान करण्यासाठी रक्तदान शिबिराचे स्वतंत्र दालन केले जाणार आहे. मनोरंजनासाठी सामाजिक प्रबोधन करणारा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. वधू- वरांचे भावी जीवन समाधानकारक व सुखी व्हावे यासाठी मान्यवर समुपदेशक व डॉक्टरांच्या मार्फत समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यांना सरकारी कन्यादान योजनेंअंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशन कडून विशेष प्रयत्न करण्यात येतील.
लोकमंगलचा मदतीचा हात
समाजामधील स्त्री भ्रूणहत्या, आत्महत्या रोखण्यासाठी लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यास प्रथम मुलगी झाल्यास त्या मुलीच्या नावे २ हजार रूपयांची ठेव लोकमंगल फाउंडेशन व त्या मुलीच्या नावाने संयुक्त खात्यामध्ये १८ वर्षे मुदतीसाठी ठेवण्यात आलेले आहे. आजपर्यंत अशा समुदायिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यांच्या २४० पेक्षा जास्त मुलींच्या नावे ठेव ठेवण्यात आलेली आहे. लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यास त्यांच्या योग्यतेप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते. आजपर्यंत अशा १८५ जावयांना रोजगार देण्यात आला आहे याच बरोबर वधू-वरास कोणता व्यवसाय करावयाचा असेल तर विशेष बाब म्हणून कर्ज देखील मिळवून दिले जाते.