वनशितला देवीच्या पूजेने लोधी समाजाचा आषाढ उत्सव संपन्न…

लोधी समाज बांधवांनी वनभोजनाचा लुटला मनमुराद आस्वाद…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २८ जुलै – आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी लोधी समाज बांधवांच्या वतीने बेडर पूल येथून वनशितला देवी मंदिरापर्यंत पारंपारिक वाजंत्रीच्या सहाय्याने मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता नैवेद्य अर्पण करून वनभोजनाचा आस्वाद घेण्यात आला.
हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यात आपल्या आराध्य देवतेला नैवेद्य अर्पण केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासून शहरात आषाढ उत्सव साजरा केला गेला. लष्कर , बेडरपूल ,नळ बाझार चौक परिसर या ठिकाणी सकाळपासूनच लोधी समाज बांधवांमध्ये उत्साह दिसून आला. नवनवीन कपडे परिधान करून आबालवृद्ध , महिला आणि युवक युवतींनी आषाढ महोत्सवात सहभाग नोंदवला.
दरम्यान रविवारी सायंकाळी पाच वाजता बेडरपूल येथून पारंपारिक वाजंत्रीच्या साह्याने आषाढ महोत्सवाची मिरवणूक सुरू झाली. वनशितला देवी मंदिरापर्यंत सदरची मिरवणूक काढून मंदिरामध्ये त्याची सांगता करण्यात आली. त्यानंतर लोधी समाजातील ज्येष्ठ पंच , मुरब्बी गण, पंच-पंचायत यांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवर माजी आमदार प्रकाश यलगुलवार , माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आदी मान्यवरांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली.
देवीची महापूजा संपन्न झाल्यानंतर उपस्थित महिला भाविकांनी देवीला नैवेद्य अर्पण करून आपल्या आप्तेष्टांसह वनभोजनाचा आस्वाद लुटला. यावेळी सारे मंदिर परिसर समाज बांधव तसेच आबालवृद्ध आणि महिला यांच्या उपस्थितीने गजबजून गेले होते. चिमुकल्या बालगोपाळांनी बगीचामध्ये खेळण्याचा आनंद लुटला , तर महिलांना आपल्या नातेवाईकांची काळजी विचारत आषाढ महोत्सव उत्साहात साजरा केला.
यावेळी लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले , लोधी समाज सामुदायिक विवाह समिती अध्यक्ष नागनाथ शिवशिंगवाले , बालाजी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष घनश्याम शिवसिंग वाले , माजी नगरसेवक भारतसिंग बडरूवाले , रवीसिंग कय्यावाले , सेक्रेटरी अशोक बोकीवाले , आदींसह पंचपंचायत मुरब्बी गण आणि लोधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामानिमित्त इतर ठिकाणी गेलेले समाज बांधव एकत्र येतात….
दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमात पर गावचे इतर ठिकाणी गेलेले नातेवाईक सणासाठी आपल्या मूळ गावी परत येतात. आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह ते सणांमध्ये सहभागी होऊन आनंद घेतात.
– भगतसिंग कल्लावाले , लोधी समाज अध्यक्ष.
आषाढ सणात समाजाची एकता दिसून येते…..
गेल्या अनेक वर्षांपासून लोधी समाजाच्या वतीने सदरची आषाढ महोत्सव आयोजित केला जातो. वनशितलादेवी मंदिरात देवीस नैवेद्य अर्पण करून भाविक समाज बांधव वनभोजनाचा आस्वाद घेतात. यामध्ये समाजाची एकता आणि अखंडता दिसून येते.
– नागनाथ शिवशिंगवाले , लोधी समाज सामुदायिक विवाह समिती अध्यक्ष.
निसर्गाच्या सानिध्यात वणभिजनाचा आस्वाद…..
लोधी समाज बांधवातील पूर्वजांनी ही परंपरा कायम ठेवली आहे या आषाढ महोत्सवाच्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचा आस्वाद घेतला जातो. आपले नातेवाईक आप्तेष्ट यांची विचारपूस यानिमित्ताने केली जाते.
– रवीसिंग कय्यावाले , माजी नगरसेवक
आकर्षक रांगोळी काढून पंढरपूरच्या विठुरायाची आषाढी उत्सव केला साजरा…
वनशितला देवी मंदिरात आकर्षक रांगोळी काढून पंढरपूरच्या विठुरायाची आषाढी उत्सव या ठिकाणी साजरा केला गेला. मागील शेकडो वर्षांपासून आषाढ महोत्सव परंपरा सुरू आहे. अखंडपणे सुरू असलेल्या या महोत्सवात आबालवृद्ध महिला, तरुण-तरुणी सहभागी होतात.
– भारतसिंग बडरूवाले , माजी नगरसेवक.