शिवकालीन लेझीमचा वाढतोय दरारा !
चौकडा अंदर-बाहर लेझीमचे पैत्रे ठरताहेत आकर्षणाचे केंद्र..!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.०१ – शिवकालीन “संबळाची मधुर धुन अन् ताशांचा कडकडाट” एकताच अंगामध्ये स्फूर्ती चढते! संबळ, ताशा, आणि लेझीम यांचा त्रिवेणी संगम एक वेगळाच आनंद देऊन जातोय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ज्या लेझीम नृत्य सुरू झाले. त्याच लेझीमची सोलापूर शहरात सध्या पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्याची प्रथा वेगाने सुरू झाली आहे. डॉल्बी, डी.जे.आणि लेझर शो यांना फाटा देत पारंपारिक मिरवणूक काढण्यास सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते सरसावले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळ आणि आता नवरात्रोत्सव मंडळांकडून भव्यदिव्य लेझीम ताफा मिरवणूक काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी लेझीम सराव जोमात सुरू आहे. चौकडा आणि अंदर बाहर हे लेझीमचे पैत्रे (प्रकार ) शिकण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढं लागलेली दिसत आहे. क्रीडा प्रकारात मोडणाऱ्या लेझीमच्या माध्यमातून संपूर्ण शरीराचा उत्तम व्यायाम होतोय. तरुण तडफदार युवकांना लेझीममुळे आनंद आणि व्यायाम हे दोन्ही गोष्टी साध्य होत आहे.
शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळनंतर आता नवरात्रोत्सव मंडळांकडून लेझीमचे डाव पद्धतशीरपणे सादर करण्यात व्यस्त झाले आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शक्तीदेवी मातेच्या स्वागतासाठी म्हणजेच घटस्थापनावेळी भव्य लेझीमचे पैत्रे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकतात. त्याच अनुषंगाने लेझीमचे चौकडा, अंदर, बाहर असे विविध पैत्रे शिकवणारे शिक्षक शहरात कमी प्रमाणातच उरले आहेत. त्यामुळे लेझीम पथकातील आकर्षकपणा कमी होत चालला आहे.
दरम्यान त्याच अनुषंगाने शहरात बळीराम जांभळे यांच्या सारखे प्रक्षिकांनी लेझीमचे पैत्रे शिकवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. विशेषतः महिला आणि मुलींमध्ये सुद्धा लेझीमचे आकर्षण आणि क्रेझ वाढत चाललेली आहे. लेझीम केवळ पुरुष किंवा मुलांचा खेळ नसून यामध्ये मुली आणि महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या मुलींना लेझीम डाव शिकण्याची आवड आहे. त्यांना देखील सदरचे लेझीम डाव शिकण्यासाठी प्रशिक्षकांची उपलब्धता करून दिली जात आहे.
लेझीम प्रकारात वेग आणि हालचाल महत्वाची.
लेझीम, झांज, ढोल-ताशा पथक यांच्या माध्यमातून शहरात पारंपारिक मिरवणूक काढली जाते. गेल्या काही दिवसांपासून या पारंपारिक मिरवणूकांची क्रेझ वाढत चाललेली आहे. मात्र यासाठी कार्यकर्त्यांमध्ये वेग आणि हलचाली सेंकदाच्या फरकाने चटकन होणे आवश्यक असते. चौकडा आणि अंदर बाहर हे लेझीम खेळण्याचे डाव सादर करताना शरीराच्या प्रत्येक हालचाली या वेगात झाल्या पाहिजेत. हे डाव कसे सादर करायचे शिकण्यासाठी शिक्षकांची गरज भासते. दररोज सराव केल्याने होणाऱ्या चुका कमी प्रमाणात होतात. यासाठी मिरवनूकीच्या किमान एक महिन्यापासून रोजचा सराव महत्वाचा आहे.
– बळीराम जांभळे, प्रशिक्षक लेझीमपथक.
लेझीम पथकात मुलींची वाढती क्रेझ…
गणेशोत्सवकाळात अनेक महिला, मुली नाशिक ढोल पथकात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोठं मोठे ढोल वाजवतात. त्याच पार्श्वभूमीवर लेझीम पथकात देखील मुलींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. अनेक मुलींनी लेझीम पथकात सामील होऊन पारंपारिक लेझीम प्रकार शिकण्यासाठी पुढाकार घेत आहेत. चिमुकले बाळगोपाळ देखील हिरहिरिने यामध्ये सहभागी होऊन आनंद लुटतात.