सोलापूरकरांनो सावधान ; शहरापासून अवघ्या ३५ किमी अंतरावर बिबट्या…? मसला येथील शेतकऱ्यावर केला हल्ला

सोलापूरकरांनो सावधान ; शहरापासून अवघ्या ३५ किमी अंतरावर बिबट्या ?

तुळजापूरातील मसला येथे तरुणावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला  !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. ५ मे

तुळजापूर तालुक्यातील मसला येथे एका तरुण शेतकऱ्यावर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. निखिल बाबुराव गायकवाड (वय २८) असे हल्ला झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर सध्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

जखमी तरुण निखिल गायकवाड
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले तरुण शेतकरी निखिल गायकवाड.

सोमवारी दुपारी निखिल गायकवाड हे त्यांच्या शेतात जनावरांना हिरवा चारा आणण्यासाठी गेले होते. ते गवत कापत असताना त्याच गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने निखिल गायकवाड यांच्यावर अचानक हल्ला केला.निखिल यांनी प्रसंगावधान राखत बिबट्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांच्या हातावर आणि पाठीवर बिबट्याने नखे मारल्यामुळे ते जखमी झाले. काही वेळ झटापट झाल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. निखिल गायकवाड यांनी जखमी अवस्थेतच घर गाठले आणि तिथून तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र बिबट्याची दहशत वाढत असून, जिल्ह्यात बारा ते पंधरा बिबटे असल्यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

 

डिसेंबर महिन्यात भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकऱ्यावर बिबट्याने असाच हल्ला केला होता. त्यानंतर तुळजापूर तालुक्यातही तशीच घटना घडल्यामुळे वनविभाग सतर्क झाले आहे. सध्या मसाला गावच्या शिवारात वनविभागाची टीम दाखल झाली असून, बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. शेतकऱ्यावर हल्ला करणारा प्राणी बिबट्याच होता याबद्दल वनविभाग साशंक असून, वनविभागाने अजूनही बिबट्याने हल्ला केला असल्याच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही. तरीही, शेतकऱ्यांनी सावध रहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *