महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार  :- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा भाजपवर हल्लाबोल…

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार 

भाजपचे सरकार केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी ; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा भाजपवर हल्लाबोल…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि १७ नोव्हेंबर – 

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. शेतकरी गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. त्या उलट भाजपचे सरकार हे फक्त अदानी, अंबानी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठीच आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. तेव्हा जनतेने सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत केले.

         

      महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापुरात आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे, मंत्री एम. बी.पाटील, सोलापूर शहर मध्यचे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे , विना कश्यप आदी उपस्थित होते.यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणावर  सडकून टीका केली. देशातील भाजपचे सरकार हे आदानी आणि अंबानी यांच्यासाठीच काम करत आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत मात्र दुसरीकडे आदानींचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत असा आरोप केला. काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांचे ६० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. विशेष म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज पुरवठा केला. सर्वांगीण कल्याणाचा प्रयत्न केला होता. मात्र मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. तर दुसरीकडे मोठ्या व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध होते. ही शोकांतिका आहे. त्यामुळे  भाजपचे सरकार व्यापाऱ्यांच्या आणि उद्योगपतींसाठीचे सरकार आहे,  अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केली.

सोलापूर जिल्ह्यातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले.

कर्नाटकात एक कोटी महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा दिला लाभ…..

कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना गृहलक्ष्मी  योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर तातडीने गृहलक्ष्मी योजना सुरू करून अंतोदय, दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करण्यात आले. एक कोटी महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ दिला. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता आल्यास महिलांसाठी विविध योजना सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *