घटनेनुसार “धनगड” ऐवजी “धनगर” असा शासन आदेश (जीआर) काढावा ; करमाळा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको
सोलापूर व्हिजन प्रतिनिधी
धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, म्हणजेच धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा शासन आदेश जीआर काढावा म्हणून जालना येथे दिपक बोऱ्हाडे हे दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून आमरण उपोषणास बसले आहेत.त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा १६ वा दिवस असून करमाळा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने मौलालीचा माळ, बायपास चौक येथे रास्ता रोको रोको करून उपोषणास पाठिंबा देत धनगर जमातीच्या मागण्या मान्य करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन दिले.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जमातीच्या यादीतील नोंद क्र. ३६ मधील धनगड या नावाच्या ऐवजी धनगर असे वाचावे असा शासन जीआर आदेश तात्काळ काढण्यात यावा. हा मुद्दा संसदेसमोर नेण्याची गरज नसल्याने तसेच महाराष्ट्र सरकारला राज्यपालांच्या परवानगीने शासन जी आर जारी करण्याचा पूर्ण अधिकार असल्याने राज्य सरकारने असा तात्काळ शासन आदेश काढावा. या संदर्भात दिपक बोऱ्हाडे हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आजचा सोळावा दिवस आहे.त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे.त्यांच्या जिविताचे काही बरे-वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहील.फडणवीस सरकार जर उपोषण दडपण्यासाठी जबरदस्तीचे, दुर्लक्ष, लबाड धोरण,अवलंबून चाल ढकल करत आसेल,तर धनगर जमात महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरही राज्य आणि केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशार रास्ता रोको दरम्यान सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला. वस्तुस्थिती नुसार,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व संविधानिक तरतुदी लक्षात घेऊन तात्काळ शासन आदेश जारी करून धनगर जमातीला त्यांच्या संविधानिक अधिकार देण्याची मागणी प्रा. शिवाजी बंडगर, अंकुश शिंदे, अंगद देवकते, बाळासाहेब टकले, हानुमंत मांढरे, आण्णा सुपनर, बिभिषण खरात, चंद्रकांत देशमुख, दादा लफडे, दत्तात्रय यादव,संदिप मारकड,तात्या काळे,अशोक शेळके,सुशील नरूटे इत्यादींनी आपल्या मनोगतात व्यक्त केली आहे. यावेळी विशेष कार्य.दंडाधिकारी पांडेकर भाऊसाहेब यांनी स्विकारले. पोलिस निरीक्षक रणजित माने, बिभिषण जाधव यांच्या आदेशानुसार चोख बंदोबस्त दिला.यावेळी सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक बाळासाहेब टकले यांनी तर उपस्थितीतांचे आभार मांडले प्रविण होगले यांनी मांडले