स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा बर्फीचे आकर्षण…..

बाजारपेठेत मिठाई घेण्यासाठी ग्राहकांची वर्दळ ……
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बाजारपेठ सजल्या आहेत. विशेष करून मिठाई दुकानात तिरंगा बर्फी ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मिठाई दुकानदारांनी बर्फीसह मोतीचूर लाडू, जिलेबी, मलाई पेढे, खवा पेढे असे विविध खाद्यपदार्थ तयार केले आहेत. सध्या बाजारपेठ तिरंगा बर्फीने सजलेली दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अबालवृद्ध ग्राहकांना तिरंगा बर्फी आकर्षित करत आहे.
दरम्यान १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय खाजगी अशा विविध ठिकाणी झेंडावंदन केले जाते. ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांना मिठाईचे वाटप करून राष्ट्रीय सण उत्साहात साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील मधला मारुती, टिळक चौक, कुंभार वेस बाजारपेठेतील विविध दुकानात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सजलेल्या दिसून आल्या. तिरंगाध्वज, तिरंगा बॅच , तिरंगा बिल्ले आणि तिरंगा बँड असे विविध तिरंगा साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होती. त्याच पद्धतीने मिठाई वाटप करून राष्ट्रीय सण उत्साहात साजरा करावा या उद्देशाने शहरातील तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांची मिठाई खरेदीला देखील गर्दी दिसून आली.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगा बर्फी…….
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन्ही राष्ट्रीय सणानिमित्त बाजारपेठेतील विविध मिठाई दुकानदार आकर्षक असे तिरंगा बर्फी बनवतात. विशेष करून चिमुकल्या बालगोपाळांना या बर्फीचे मुख्य आकर्षण असते. या दिवशी बर्फीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहक मोतीचूर लाडू तसेच तिरंगा बर्फी खरेदी करून नागरिकांमध्ये वाटप करत असतात. त्याचप्रमाणे शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला जातो त्यासाठी बुंदी आणि जिलेबी शाळा व्यवस्थापन समितीकडून घेतली जाते.
– रविकांत तंबाके, विक्रेते वीरेश स्वीट्स कुंभारवेस सोलापूर.
मिठाईंचे दर प्रति किलोत
तिरंगा बर्फी – ३२० रुपये किलो, मोतीचूर लाडू – १६० ते २४० रुपये किलो,पेढा – ३२० ते ३६० रुपये किलो ,कलाकंद – ५०० रुपये किलो,कुंदा – ३०० रुपये किलो,बुंदी – १६० रुपये किलो, जिलेबी – १६० रुपये किलो, जामुन – २०० ते २४० रुपये किलो,