हिंदू जनआक्रोश मोर्चा होणार का रद्द ?
शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी परवानगी नाकारली :- पोलीस आयुक्त एम राजकुमार
देवी भक्तांनी पावित्र्य राखून ज्योत घेऊन जावे विनाकारण हुल्लडबाजी केल्यास कारवाईचा दिला इशारा

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर शहरात सण उत्सव काळात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शारदीय नवरात्र महोत्सव काळात आंदोलन, मोर्चा, सभा घेण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचा आदेश यापूर्वीच पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने
(दि.२४ ) सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात काढण्यात येणारा हिंदू जनआक्रोश मोर्चा रद्द करण्यात आला आहे. शहरातील सन उत्सव काळ लक्षात घेता, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त एम.राजकुमार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सकल हिंदु समाजाच्या वतीने मल्लीकार्जुन मंदीर बाळीवेस टिळक चौक मधला मारुती -कोंतम चौक ते कन्ना चौकापर्यत मोर्चा काढण्यात येऊन कन्ना चौक येथे सभेचे आयोजन करण्यासाठी आयोजकांनी पोलिसांना परवानगी मागीतलेली होती. मात्र शहरात नवरात्र उत्सव सुरु असल्याने सोलापूर शहरात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागु असून याकाळात मोर्चाचे आयोजन करण्यास मनाई असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा मोर्चा रद्द करण्यात आला असून कोणीही मोर्चा व सभेसाठी एकत्रित जमा होऊ नये. असे अवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
धार्मिक काळात हुल्लडबाजी नकोच
नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने अनेक देवीभक्त सोलापूर शहरातील तुळजापूर नाका येथून तुळजापूरकडे मार्गस्थ होत आहेत. त्यावेळी अनेक देवीभक्त आपल्या दुचाकीवर विनाकारण हुल्लडबाजी करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. देवीभक्तांनी पावित्र्य राखून आपल्या धार्मिक स्थळाकडे मार्गस्थ व्हावे. ज्योत मार्गावर कोणतीही हुल्लडबाजी करू नये. मोटार वाहन कायद्याचे पालन करावे. अन्यथा त्यांच्यावर अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी दिला.