हिंदवी स्वराज्य म्हणजे रामराज्याचे मूर्तिमंत उदाहरण : हिंदूसाम्राज्य दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन

सोलापूर व्हिजन 

सोलापूर दिनांक : छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य म्हणजे रामराज्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे प्रतिपादन व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ (शिवस्मारक) तर्फे हिंदूसाम्राज्य दिनानिमित्त शिवस्मारक सभागृहात आयोजित व्याख्यानामालेत सोमवारी ते बोलत होते. हिंदूसाम्राज्य दिन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

व्याख्यानमालेचे उद्घाटन रा. स्व. संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर उपस्थित होते.व्याख्याते गणेश शिंदे म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज होते. सुलतानांच्या आणि पाचही शाह्यांच्या जुलमामुळे आत्मविश्वास गमावलेल्या समाजाला धीर देण्याचे आणि धाडसी बनवण्याचे कार्य छत्रपती श्री शिवरायांनी केले. हिंदवी स्वराज्याचे तोरण बाजारात विकत मिळाले नाही. त्यासाठी हजारो मावळ्यांनी बलिदान दिले. हा इतिहास पुढील पिढीला शिकवणे गरजेचे आहे. पदोपदी मृत्यू दिसत असतानाही प्राणांची बाजी लावून त्यांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. काळाची पावले छत्रपती श्री शिवरायांनी ओळखली. ती आपल्यालाही ओळखता येणे आणि आपण त्याप्रमाणे कृती करणे यातच छत्रपती श्री शिवरायांनी आपल्याला दिलेल्या महान वारशाची जपणूक होणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.यावेळी शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने, कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, संचालक प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापक मल्लिनाथ होटकर यांची प्रमुख उपस्थित होती. शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद जिरांकलगीकर यांनी सूत्रसंचालन तर धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

२३ जून रोजी जुळे सोलापूरात व्याख्यान

शिवस्मारकतर्फे रविवार, २३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता जुळे सोलापूरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्थापलेले हिंदूसाम्राज्य’ या विषयावर व्याख्याते वैभव कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *