पूर ओसरतोय ? मात्र आसवांचा महापूर कायम ; उरलेल्या संसाराची धीरोदात्तपणे  नव्याने उभारणी सुरू…

पूर ओसरतोय ? मात्र आसवांचा महापूर कायम ; 

राहिलेले जमा करत संसाराची गोळा बेरीज सुरू 

 रेड अलर्टमुळे पुन्हा महापुराची टांगती तलवार

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

कधी नव्हे तो सोलापूरला महापुराने झोडपून काढले. सीनामाई आली आणि सर्वांना घेऊन गेली… संसाराची राख रांगोळी झाली. मात्र जिद्दीने पुन्हा एकदा गोळा बेरीज सुरू केली.. असे काहीसे चित्र सोलापूर शहरातील बाधित गावागावात दिसत आहे. जिल्ह्यातील दक्षिण उत्तर सोलापूर तालुक्यासह अक्कलकोट माढा मोहोळ करमाळा या तालुक्यात पावसाचे मोठे थैमान होते. पावसाचा हाहाकार सर्वत्र झाल्याने सीनामाई दुथडी भरून पाहू लागली. पाणी शेत शिवारात पाणी घरादारात आणि पाणी डोळ्यात सुद्धा तरळले… मात्र संसार मोडला पण मोडला नाही कणा… यायुक्तीप्रमाणे चिमुकला बालगोपाळांनी तसेच घरातील ज्येष्ठांनी महापुरात वाहून गेलेले साहित्य गोळा करत पुन्हा एकदा संसार नव्याने उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराची गोळाबेरीज सुरू केलेली दिसत आहे.

   विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे पाण्याचा वेढा मोठ्या प्रमाणात होता. तसेच हत्तुर येथील सिंदखेड या गावात देखील सुमारे एक हजार ग्रामस्थ गावात अडकून पडले होते. याशिवाय मोहोळ माढा आणि करमाळा या तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील पुराचा फटका शेतकऱ्यांना बसला. तिर्हे गावात देखील पाण्याचा कहर पहावयास मिळाला. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने होत्याचे नव्हते झाले. शेवटी शनिवारी “पूर ओसरल्यानंतर आसवांचा महापूर कायम” आहे. मात्र त्यातून गावकरी मोठ्या धीरोदात्तपणे वाट काढत आहेत. हे विशेष…

दरम्यान शहरातील महापुरानंतर सोलापूर जिल्ह्यात महापुराचे थैमान सुरू झाले. सर्वाधिक फटका मोहोळ करमाळा माढा दक्षिण सोलापूर या तालुक्यांना बसला. जनावर शेती धान्य सर्व साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने हातात उदास झालेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आस आणि अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने बाधित क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार त्यानंतर आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी करून तात्काळ मदतीचे हात दिले जातील. त्यासाठी सरकार प्रयत्नशील असून लवकरच निधी शेतकऱ्यांकडे वर्ग केला जाईल. असे आश्वासन दिले.

पूरग्रस्त शेतकऱ्याकडून अपेक्षा  

मदतीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दानशूर व्यक्ती संस्थांकडून मदत पाठवली जात आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील अन्नधान्यांचे किट वितरण केले जात आहे. मात्र ही मदत तुटपुंजी ठरू नये यासाठी सरकारने देखील विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. अगोदरच संसाराची राख रांगोळी झालेली असताना पीडित वंचित शेतकऱ्यांची थट्टा सरकारने करू नये. हेक्टरी ५०  हजाराची मदत द्यावी. तसेच जनावरांना चारा आणि मोफत धान्य द्यावे. याशिवाय घर आणि कपड्यांसाठी वेगळी मदत द्यावी अशी माफक अपेक्षा आणि मागणी बाधितांकडून केली जात आहे.

रेड, ऑरेंज अलर्टमुळे पुन्हा महापुराची टांगती तलवार

हवामान विभागाकडून अजूनही २ दिवस सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यात रेड, ऑरेंज, यलो अलर्टचा इशारा देण्यात आला असल्याने सीना नदीच्या वरील भागात (धाराशिव, अहिल्यानगर) पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास पुन्हा महापुराचा धोका होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासन कायम अलर्ट मोडवर असून, मात्र आम्ही दिलेल्या सुचनांचे पालन जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी वेळेवर करावे, असाही सल्ला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला.

१५६ पशुधन अन् १८ हजार कोंबड्या मयत

२१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत सीना नदीतून मोठा विसर्ग सोडल्याने जिल्ह्यातील ६ तालुक्यांना बसलेल्या फटक्यांमध्ये प्राथमिक अंदाजानुसार १०३ मोठे पशुधन, ५३ लहान पशुधन आणि १८ हजार ०४१ कोंबड्या मयत झाल्या आहेत. याबाबतचे पंचनामे करण्यात येत असून, अजून आकडे वाढण्याची शक्यता आहे. तर नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्याच्या विविध भागात आजतागायत ८ व्यक्तींचाही मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

महापुरातून ४००२ जणांना बाहेर काढले

जिल्हा आपत्ती विभाग, एनडीआरएफ आणि आर्मीच्या जवानांनी महापुरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रचंड मेहनत घेवल्याने ४००२ जणांचे प्राण वाचले. या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून अत्यंत कठीण ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढल्याने त्या भागातील गावकऱ्यांनीही या जवानांचे कौतुक केले. इतकेच नाहीतर या जवानांनी अडकलेल्या नागरिकांना जेवणाचे डबे, पाणी आणि औषधेही पोहोच केली होती.

पूरग्रस्त बाधित कुटुंबाना खालील वस्तूंची गरज

ज्वारीचे पीठ, गहू आटा, हरभरा दाळ, स्वयंपाक तेल (गोडेतेल). मीठ, तिखट मसाला, हळद, मेणबत्ती पाकीट मध्यम आकाराचे, मच्छर आगरवत्ती. काडीपेटी, टॉर्च विथ बॅटरी, इमरजन्सी लाईट, अंगाचे साबण, प्लास्टीक ताडपत्री, चादरी, सतरंजी, याचबरोबर पातेला, तवा, ताट, तांबे, वाटी, चमचा, ग्लास, उलतन, पक्कड/सांडशी, पळी (आमटी वाढण्यासाठी), प्लास्टीक बकेट, दुध पावडर आर्दीची मोठ्या प्रमाणात गरज असून, ज्या नागरिकांना सहकार्य करायचे आहे; त्यांनी त्या-त्या भागातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आदी अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपले धान्य त्यांच्या ताब्यात द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे.

परजिल्ह्यातून चारा मागविणार; प्रतिकुटुंब २० किलो धान्य वाटप

पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी चाराटंचाई जाणवू लागली असून, त्यांच्यासाठी ५० ते ६० मे. टन चारा परजिल्ह्यातून मागविण्यात येणार आहे. तर पूरग्रस्त भागातील नागरिकांना प्रतिकुटुंब १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ मोफत वाटप करण्याच्या सुचना पुरवठा विभागाला दिल्याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

इतकेच कायतर चिखल, कचरा उचलण्यासाठी जेसीबी, डंपरचाही मोठ्या प्रमाणात वापर करून प्रत्येक गाव पुर्वपदावर आणण्यात येणार आहे. दूषित पाणी स्वच्छ होईपर्यंत गावोगाव पाणी टँकरची सोय केली जाणार आहे, स्वच्छतेनंतर डासांचा त्रास कमी करण्यासाठी फॉगिंग, डिडीटी पावडर टाकली जाणार आहे. विद्युत पुरवठाही पूर्ववत करून जनजीवन सुरळीत करणार आहोत.

कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर

 

घाबरू नका; जिल्हा प्रशासन कायम आपल्या सोबत..

 जिल्ह्यातील वरील तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे सीना नदीला इतका मोठा महापूर पहिल्यांदाच आला असल्याने सोलापूर-विजयपूर, सोलापूर-पुणे हा महामार्ग बंद करावा लागला. दोन दिवसांपासून हळूहळू पाणी कमी होवू लागले असून, लवकरच जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. वाहनेही आता सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आसपासच्या जिल्ह्यात अजून रेड, ऑरेंज, यलो अलर्टचा इशारा देण्यात येत असल्याने महापुराची भीती आहे. तरीही महापूर आल्यास नागरिकांनी घाबरू नये; प्रशासन पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे; जिल्ह्यावर आलेल्या संकटाशी सर्वजण मिळून लढू असेही आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.

६ तालुक्यात ७२ निवारा केंद्रांची निर्मिती: 

महापुरातून काढण्यात आलेल्या नागरिकांना त्या-त्या भागातील शाळा, महाविद्यालये, मंदिरात स्थलांतर करण्यात आले असून, या ६ तालुक्यात ७२ ठिकाणी निवारा केंद्रांची निर्मिती केली आहे. या नागरिकांच्या गरजेनुसार आमचे अधिकारी-कर्मचारी धान्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू पुरवित आहेत. यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय मदत कक्षांची निर्मिती करण्यात आली आहे. या मदत कक्षातील अधिकारी-कर्मचारी २ ते ३ दिवस अशा पध्दतीने मदत करणार असून, यानंतर त्या-त्या भागातील स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे.

साडेतीन लाख हेक्टर शेतीचे नुकसान

अजून पंचनामे सुरूच : दि. १३ ते २३ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस आणि महापुराने ७१८ गावातील ३ लाख १२ हजार ७०५ शेतकऱ्यांचे साडेतीन लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. अजून पंचनामे सुरुच असल्याने हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या नुकसानीमध्ये तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, ऊस, फळबागा, कांदा, द्राक्षबागा आदींचा समावेश आहे. या बाधीत क्षेत्रामध्ये जिरायत क्षेत्र २ लाख ३५ हजार २०८ इतके तर बागायत क्षेत्र ५५ हजार हेक्टरपर्यंत आहे. उर्वरित फळपिकांचे क्षेत्र आहे. अजून पंचनामे सुरूच असल्याने हा प्राथमिक अंदाज आहे.

शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

 

दक्षिणमधील निवारा केंद्र आणि स्थलांतरीत संख्या

 पिर महादेव प्रशाला वांगी ३५, जीवनज्योत प्रशाला कंदलगाव ३. जिल्हा परिषद शाळा गावडेवाडी ८६, आसबे वस्ती व गुंजेगाव शाळा ६००, कलावती खंदारे (देशपांडे) प्रशाला ३९५, जिल्हा परिषद शाळा मंद्रुप ६, के आश्रमशाळा बसवनगर २६०, के श्रध्दानंद महाराज मठ बसवनगर ३५, के सोमेश्वर मंदिर हत्तूर १५०, * जि.प. शाळा हत्तूर १७. जि.प. शाळा सिंदखेड ७५, यशवंत विद्यालय औराद २००, समाजमंदिर औराद २५०, के हत्तरसंग मंदिर १०, जि.प. शाळा बोळकवठे १५०, ग्रामपंचायत सभागृह संजवाड ३५, पुर्णानंद मठ बिरनाळ १५२, * एकूण १९ निवारा केंद्र २४५९ या गावातील ६९ नागरीकांचे बचावकार्य वांगी २७, वडकबाळ १५, राजूर २२, हत्तूर ५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *