गिरणी कामगारांच्या वारसांना विस्थापित होऊ देणार नाही
बंद गिरणी कामगारांचा मेळाव्यात आडम मास्तरांचे आश्वासन..
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि. १५ जुलै – लढाऊ गिरणी कामगारांनी गिरण्या बंद पडल्यानंतर त्याच ठिकाणी सरकारशी संघर्ष करून आपल्या हक्काचे घर मिळविले. त्याच धर्तीवर सोलापूरच्या आर्थिक जडणघडणीत भरीव योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांच्या वारसांना विस्थापित होऊ देणार नाही आणि त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्याचा विडा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी बंद गिरणी कामगारांच्या मेळाव्यात उचलला आहे.
सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे कॉ. नारायणराव आडम बंद गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने बजरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बंद गिरणी कामगारांचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.१९८०-९० च्या दशकात महाराष्ट्र कापड निर्मितीत अग्रेसर राज्य होता. देशाची राजधानी मुंबई या शहरात लाखोंच्या संख्येने गिरणी कामगार आपले बस्तान बसविले होते. परंतु १९९२ साली भारतात खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे वार सर्वत्र वाहू लागले. त्यामुळे मुंबईतील उद्योगधंद्यांना गरगर लागली. मुंबईतला गिरणी कामगार हळूहळू बेकार झाला. कित्येक कामगारांची उपासमार झाली, संसार उध्वस्त झाले. अखेर सर्व कापड गिरण्या बंद पडल्या. तोच कित्ता महाराष्ट्रातील कापड व सुत निर्मिती करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात गिरवला गेला.
दरम्यान सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री यांनी राज्यातील गिरणी कामगारांच्या प्रश्नासंबंधी बैठक बोलावली. त्या बैठकीस मला कामगार प्रतिनिधी म्हणून निमंत्रण दिले. त्या बैठकीत मी उपस्थित होतो. त्यावेळी मुख्यमंत्री यांना सोलापूरातील गिरणी कामगारांच्या प्रश्नासंबंधी पोटतिडकीने विचारणा केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कि, मुंबईच्या गिरणी कामगारांच्या धर्तीवर सोलापूरातील गिरणी कामगारानाही हक्काचे घर देण्याची हमी त्यांनी दिली होती. अद्याप त्या कामाला गती आलेली नसून माझा मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा चालू आहे.
सदर मेळाव्यात संस्थेच्या कार्यालेखाचा अहवाला मांडला. यावेळी सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख., नलिनीताई कलबुर्गी यांनी मेळाव्यास संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर कॉ. युसुफ शेख, संजय ओमकार, रवी गेंटयाल, किशोर मेहता आदींची उपस्थिती होती. मेळाव्याचे प्रास्ताविक कॉ. युसुफ शेख (मेजर) तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ. बापू साबळे यांनी केले.