गौराई सणाला हारांचे दर गगनाला ! गौरी गणपती हारांचा सट हजारो पार….

गौराई सणाला हारांचे दर गगनाला….!

गौरी गणपती हारांचा सट हजारो पार गणेशभक्त झाले बेहाल….

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज , 

सोलापूर , दि. ११ सप्टेंबर – आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण गौराईचा सण ! मात्र गौराईच्या सणाला महागाईचे ग्रहण ? असे चित्र सध्या बाजारात दिसत आहे. गौरी गणपतीच्या सणाला नेहमीच हारांचे दर गगनाला भिडतात. मात्र यंदाच्यावर्षी हारांच्या दरात मोठाच कहर झालेला आहे. हारांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गणेश भक्तांचे हाल बेहाल झालेले दिसत आहेत.

   

   शहरातील विविध फुलांच्या बाजारात गौरी गणपती सणासाठी तयार केलेले हारांचे तसेच संपूर्ण गौरी हारांच्या सट यांचे दर पार गगनाला भिडलेले दिसून आले. नेहमी शंभर रुपयांना असणारा झेंडू आणि गुलाबाचा साधा हार आज दीडशे ते दोनशे रूपयापर्यंत गेला आहे. तर निशिगंध , पंढरी व पिवळी शेवंती, कमळ , सुपारी , अष्टर तसेच विविध प्रकारचे आकर्षक फुलांपासून तयार केलेले हार, हजारी मनसबदार ठरलेले आहेत. विशेष ऑर्डरनुसार तयार केलेला कमळ फुलांच्या कळ्यांचा बालाजी हाराचा सट सुमारे तीन हजार रुपये पर्यंत विकला गेला. त्यामध्ये गौरीसाठीचे दोन हार , दोन दंडी , चार गजरे , गणपतीचा एक हार , मागणीनुसार दोन वेण्या यांचा समावेश होता. पुष्पहारांचा प्रत्येक सट वेगवेगळ्या किमतीला विकला गेला.

    दरम्यान गौरीला कमळ फुलांचा मान असल्यामुळे अनेक भाविकांनी कमळ फुलाच्या कळ्यांचा बालाजी हार विक्रेत्यांकडून बनवून घेतला होता. या बालाजी हाराला ग्राहकांमधून मागणी होती. त्याखालोखाल सुपारीच्या लाल फुलांपासून बनवलेला आकर्षक सुपारीहार देखील सर्वाधिक विक्रीला गेला.सुपारी हाराचे दर देखील सट प्रमाणे दोन हजार रुपये पर्यंत होते. त्याचं प्रमाणे,  निशिगंध , पाकळी गुलाब , बटन गुलाब, पांढरी आणि पिवळी शेवंती यांपासून बनवलेला हार सर्वसामान्यपणे ग्राहकांच्या पसंतीस उतरला. या हारांचे दर देखील हजारो रुपयांच्या घरात होते. हारांचे सट घेण्याकडे यावेळी ग्राहकांचा कल होता. तर काही ग्राहकांनी सुट्टी फुले विकत घेऊन घरातच आपल्या पद्धतीने हार तयार करून गौरीला अर्पण केला.

सुट्टी फुले महाग झाली असल्याने विविध पुष्पहारांच्या किमतीत वाढ. 

यंदाच्या वर्षी सुट्टी फुले महाग झाली आहेत. फुलांची आवक कमी असल्याने सुट्ट्या फुलांच्या दरात वाढ झाली आहे. गौरी गणपती सणाला शेवंती या फुलाला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे शेवंतीचे दर सुमारे ५०० रुपये किलो पर्यंत गेले आहेत. त्याच पद्धतीने निशिगंध आणि बटन गुलाब यांचे दर देखील ४०० ते ५०० रुपये पर्यंत गेले आहेत त्यामुळे हारांचे दर देखील वाढीव आहेत. गौरी गणपती सणाचा पुष्पहारांचा एक सट एक हजार रुपयांपासून ते तीन हजार रुपये पर्यंत आहे.

 – नयुब ढालाईत ,  पुष्पहार विक्रेते.

यंदाच्या वर्षी बाजारपेठेत हारांचे दर वाढलेले आहेत. 

यंदाच्या गौरी गणपती सणाला हारांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साध्या हारांचे दर देखील दोनशे रुपयांहून अधिक आहेत. हारांच्या दरात दुपटीने आणि तिपटीने वाढ झाल्याने गौरी गणपतीचा सण साजरा कसा करायचा असा प्रश्न निर्माण होत आहे. 

– श्रीकांत गायकवाड , गणेशभक्त.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *