सोने झाले ७५ हजारी मनसबदार ; सोन्याची झळाळी दिवसेंदिवस कायम
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची वाढती मागणी भविष्यात दर राहणार तेजीत..!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि. ०२ ऑक्टोंबर – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी आणि गुंतवणूक कायम असल्याने सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. भविष्यकाळात देखील सोन्याचे दर हे तेजीतच राहतील, असा अंदाज आता वर्तवला जात आहे.
पितृपक्ष पंधरवड्यात सोन्याचे दर कमी होतील आणि आपण सोने खरेदी करूया अशी ग्राहकांची आशा होती, परंतु ती आशा आता फोल ठरली आहे. कारण फेडरल बँकेने व्याज दरात कपात केल्याने सोन्यातील गुंतवणूक कायम राहिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वरचेवर वाढत असल्याने सोने आता ७५ हजारी मनसबदार झाले आहेत. सोन्याची झळाळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या शुद्ध २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७५ हजार ५०० रुपये इतका आहे. तर चांदीने देखील आपली चकाकी वाढवली आहे. सुमारे ९१ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे चांदीचा दर आहे. भविष्यात दसरा, दिवाळी आणि त्यानंतर येणारा लग्नसराईचा मौसम या काळात सोन्याची पिवळी धमक आणखीन वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ग्राहकांच्या हातात जेव्हा पैसा असेल तेव्हाच सण समारंभ…
आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरवातावरण आणि फेडरल बँकेचे व्याजदर कपात या दोन्ही निर्णयांचा सोन्याच्या दरावर परिणाम होतो आहे. सध्या ग्राहकांकडे पैसा असेल तरच सण समारंभ साजरा होतो. पूर्वीप्रमाणे सण आल्यानंतर सोने घेऊ अशी रीत आता मागे पडत चाललेली आहे. सर्वसामान्य तसेच शेतकरी ग्राहक क्रयशक्ती पाहूनच सोने खरेदीकडे वळतो. पितृपक्ष पंधरवड्यात सोन्याचे दर कमी होतील असा अंदाज होता परंतु तो अंदाज फोल ठरला आहे. भविष्यातील दसरा दिवाळी आणि लग्नसराई पाहता सोन्याचे दर हे चढेच राहतील
– सिद्धाराम शिंगारे, उपाध्यक्ष सोलापूर सराफ व्यापारी असोसिएशन.