पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरलेले सोन्याचे मंगळसुत्र हस्तगत ; नुकतेच झाले १९ वर्ष दोघा आरोपींना ठोकल्या बेड्या
सोन्याचे मंगळसूत्र तसेच दुचाकी असा २ लाखांचा मुद्देमाला जप्त शहर गुन्हे शाखेची कामगिरी
ते गुन्हेगार रेकॉर्डवरील नसून शिक्षणासाठी चोरीचा कारनामा केल्याची तपासात मिळतेय प्राथमिक माहिती

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
चेन स्नॅचिंगमधील घटनेत फीर्यादी इंदुबाई तानाजी कांबळे या व त्यांचा भाऊ बाबूराव भोपळे हे दुचाकीवरून वांगी येथून लक्ष्मी विष्णू चाळीकडे येत होते. भोजप्पा तांड्याजवळ दोन चोरट्यांनी थांबवून फिर्यादीस सेटलमेंटकडे जाणारा रस्ता कोणता आहे. असे विचारण्याचा बहाणा करून गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने लुटून नेले होते. या प्रकरणातील दोघा संशयितांच्या विरोधात सलगरवस्ती पोलिस ठाण्यात (दि.३) ऑगस्ट रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. यागुन्ह्यातील दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आदित्य रमेश कोणदे (वय १९) रा.३७७ हत्तुरे वस्ती, सोलापुर, पृथ्वीराज श्रीशैल पुजारी (वय १९) रा.६५, सैफुल, अशा त्या दोन संशयित आरोपीची नावे असून त्यांच्याकडून सोन्याचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या त्या दोघांना न्यायालयात हजर केले, असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकास दोन व्यक्ती हे होटगी रोडवरील तुळजाई लॉन्स जवळ, मोकळया मैदानात संशयितरित्या थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्या आधारे आदित्य रमेश कोणदे, (वय१९) पृथ्वीराज श्रीशैल पुजारी (वय१९) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत वर्दीचा हिसका दाखवला असता, गुन्हयातील जबरदस्तीने हिसकावलेले सोन्याचे गंठण व गुन्हयात वापरलेली मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबूली दिली. त्यानुसार सलगरवस्ती पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.क.३०९(४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हयातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण २,००,००० किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त, राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार जावेद जमादार, महेश शिंदे, अजिंक्य माने, राजु मुदगल, धिरज सातपुते, आबाजी सावळे, कुमार शेळके, महेश पाटील, विठठल यलमार व सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड व मच्छिद्र राठोड, चालक काटे व काळे यांनी पार पाडली आहे.
सोन्याचे मंगळसूत्र चोरणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार नसून ते दोघेही तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचे (१९ वय) पूर्ण झाले आहे. महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी त्यांना पैशांची नितांत गरज होती. घरची हालखिची परिस्थिती असल्याने घरामध्ये पैसे न मागता दोघा संशयित आरोपींनी त्रयेस्थ व्यक्तीची दुचाकी घेऊन हा कारनामा केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.